Spicejet Airline: स्पाइसजेटविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल; एअरलाईनचे ऑपरेशन थांबवण्याचे निर्देश देण्याची मागणी
SpiceJet Flight | File Image | (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून स्पाइसजेटच्या विमानांमध्ये (Spicejet Airline) वारंवार बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. याबाबत कंट्रोलर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या 18 दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या आठ घटनांनंतर डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये केंद्र आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पाईसजेट एअरलाइन्सचे ऑपरेशन थांबवण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.

यासोबतच प्रवासादरम्यान ज्या प्रवाशांना त्यांच्या जीवाला धोका होता आणि मृत्यूच्या भीतीने ज्यांना मानसिक आघात सहन करावा लागला आहे, अशा प्रवाशांना योग्य शुल्काची भरपाई करण्याचे निर्देश देण्याचीही विनंती केली आहे. याचिकाकर्ते राहुल भारद्वाज आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा यांनी याचिका दाखल केली आहे, ज्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालय, डीजीसीए आणि इतरांना, सर्व सुरक्षा उपायांचे पालन होत नाही तोपर्यंत स्पाईसजेट एअरलाइन्सचे ऑपरेशन थांबवण्याच्या निर्देश देण्याबद्दल भाष्य केले आहे.

या याचिकेवर सोमवारी दिल्ली खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणी होणार आहे. याचिकेत आरोप केला आहे की, विमान कंपन्यांनी कायद्याच्या नियमाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केले आहे, जे प्रवाशांचे जीवन, स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि मालमत्तेचे संरक्षण आणि सुरक्षा देते. यामुळे प्रवासी आणि नागरिकांसाठी सर्व सुरक्षा उपायांची खात्री करता येईल अशा सर्व उपायांची शिफारस करण्यासाठी विमान वाहतूक तज्ञांद्वारे स्वतंत्र विशेष चौकशी स्थापन करण्याचे निर्देश दिले पाहिजेत, असेही यात म्हटले आहे. (हेही वाचा: Air India Express चं Calicut-Dubai विमान जळण्याचा वास आल्याच्या कारणास्तव Muscat ला वळवलं!)

नुकतेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सांगितले आहे की, दररोज अशा सरासरी 30 घटना घडतात परंतु त्यांचा सुरक्षिततेवर परिणाम होत नाही. स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंग यांनी अलीकडेच एएनआयला दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितले की, ‘स्पाईसजेट 15 वर्षांपासून सुरक्षित एअरलाइन चालवत आहे. सध्या माध्यमांमध्ये ज्या प्रकारच्या घटनांबद्दल बोलले जात आहे त्या क्षुल्लक आहेत आणि अशा घटना एअरलाइन्समध्ये दररोज घडतात.’

दरम्यान, स्पाइसजेट विमान कंपनी गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात आहे. स्वस्त सेवा देणाऱ्या स्पाइसजेटला 2018-19 मध्ये 316 कोटी रुपये, 2019-2020 मध्ये 934 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 998 कोटी रुपयांचा तोटा झाला.