सोन्याची किंमती सातत्याने वाढत असताना मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची 'सीरिज-एक्स' लॉन्च केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना बाजार भावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करता येणार आहे. 2 मार्च, सोमवार पासून सुरु झालेली ही योजना शुक्रवार 6 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या योजनेमध्ये सोन्याचा भाव 4,260 रूपये प्रती ग्रॅम असा असणार आहे. या गुंतवणूकीत तुम्हाला व्याज देखील मिळेल. इतकंच नाही तर ऑनलाईन खरेदीवर 50 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
सार्वभौम सुवर्ण रोखे या योजनेत तुम्हाला किमान एक ग्रॅम सोने खरेदी करणे बंधनकारक आहे. या सोन्याचा भाव 4,260 रूपये असेल. तर ऑनलाईन खरेदी केल्यास प्रती ग्रॅम सोन्यामागे 50 रुपयांची सवलत मिळेल. म्हणजेच एक ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 4210 रुपये मोजावे लागतील. (सोने-चांदीचे दर वाढले; कोरोना व्हायरसचा परिणाम शेअर बाजारावरही)
काय आहे सार्वभौम सुवर्ण रोखे योजना?
नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरु झाली असून सोन्याची मागणी कमी करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास टॅक्सबचत होणार असल्याने ही गुंतवणूक ग्राहकांच्या फायद्याची ठरणार आहे. बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेश ऑफ इंडिया लिमिटेड तसंच ठराविक पोस्ट ऑफिसमधून तुम्ही या योजनेअंतर्गत सोने खरेदी करु शकता. या गुंतवणूकीत तुम्हाला 11 मार्चपर्यंत बॉन्ड मिळणार आहे.
योजनेचे फायदे:
या योजनेअंतर्गत एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकते. टॅक्स बचत करणाऱ्या या गुंतवणूकीत तुम्हाला 2.5% व्याज मिळेल. तसंच यावर टीडीएस देखील कापला जाणार नाही.
त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास ही चांगली संधी आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास सरकारकडून 6 मार्चपर्यंत दिल्या जाणाऱ्या या योजनेचा नक्की लाभ घ्या.