केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन (Special Parliament Session) बोलावले आहे. हे अधिवेशन नेमके कोणत्या कारणासाठी बोलावले आहे याबाबत अद्याप कोणालाच स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी 18 ते 22 सप्टेंबर या कालावाधीत पार पडणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आराखडा मागितला आहे. तसेच त्यांनी 9 मुद्देही सूचवले असून त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी करत विनंतीही केली आहे.
सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने18 सप्टेंबर 2023 पासून संसदेचे विशेष पाच दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. हे विशेष अधिवेशन इतर राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता बोलावण्यात आले आहे. आपल्यापैकी कोणालाच त्याच्या अजेंड्याची कल्पना नाही. त्यामुळे विरोधकांना या अधिवेशनासंदर्भात आवश्यक ती माहिती द्यावी. त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावर सरकारने पारदर्शकता राखावी. देशाला अंधारात ठेवू नये.
ट्विट
Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi wrote a letter to Prime Minister Narendra Modi stating that the Special Session of the Parliament had been called without any prior discussion with the opposition and also sought details of the agenda of the session. pic.twitter.com/02ZH4gbStd
— ANI (@ANI) September 6, 2023
आगामी अधिवेशनात केंद्र सरकारविरोधात विविध मुद्द्यांवर एकत्र लढायचे असा निर्धार इंडिया आघाडीने केला आहे. या पार्श्वभूमीवर सोनियां गांधींनी लिहीलेले पत्र अधिक महत्त्वाचे ठरते. विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक लवकर मंजूर करण्याचीही मागणी केली आहे. विरोधी पक्षांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी अधिवेशनात एकत्र येण्याचा आणि अदानीचा मुद्दा उचलून धरण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच मध्य प्रदेशात पहिली विरोधी पक्षांची संयुक्त जाहीर सभा आणि पुढील सभा भोपाळमध्ये विरोधकांनी ठरवले आहे.