Son Kills Mother for Money: उत्तर प्रदेशातील फतेहपूर (Fatehpur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका मुलाने पैशांसाठी आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. शनिवारी सकाळी स्थानिक पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने या आईच्या मारेकरी मुलाला अटक केली. अहवालानुसार, ऑनलाइन गेमिंगमध्ये अडकून आरोपीने 4 लाख रुपये गमावले होते. याशिवाय घरातील दागिनेही तो छुप्या पद्धतीने विकत होता. हे दागिने परत आणण्यासाठी आई-वडिलांच्या दबावाला कंटाळून, तसेच विम्याचे 50 लाख रुपये मिळावे म्हणून आरोपीने आईचा दोरीने गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह गोणीत भरून यमुना नदीच्या काठावर फेकून दिला. एएसपी विजय शंकर मिश्रा यांनी ही माहिती दिली.
शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलीस लाईन सभागृहात पत्रकारांशी झालेल्या पत्रकार परिषदेत एएसपी यांनी सांगितले की, 20 फेब्रुवारीला सकाळी धाटा पोलीस स्टेशन हद्दीतील अधहौली गावात राहणारे रोशन सिंग चित्रकूटच्या राजापूर शहरातील हनुमानाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मुलगा हिमांशू आणि पत्नी प्रेमादेवी (49) घरात होते. हिमांशूला ऑनलाइन गेमचे व्यसन होते. या गेमिंगमध्ये त्याने 4 लाख रुपये गमावले होते. (हेही वाचा: Shocking! पोलीस कोठडी आणि सुधारगृहातही सुरक्षित नाहीत महिला, 5 वर्षांत बलात्काराचे 275 गुन्हे दाखल; NCRB च्या अहवालात धक्कादायक खुलासा)
रोशन सिंग परत आल्यानंतर त्यांनी हिमांशूकडे प्रेमादेवी यांची चौकशी केली. त्यावर त्याने प्रेमादेवी आपल्या वडिलांना भेटायला माहेरी गेल्याचे सांगितले. चौकशी केली असता प्रेमादेवी तेथे पोहोचल्याच नव्हत्या. त्यानंतर हिमांशूही घरातून पळून गेला. दुसऱ्या दिवशी प्रेमादेवीचा मृतदेह यमुनेच्या काठावर पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणी मुलाच्या संशयास्पद हालचाली पाहून मृताचा पती रोशन सिंग यांनी आपला मुलगा हिमांशूविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.
एएसपी विजय शंकर मिश्रा यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 8.00 वाजण्याच्या सुमारास आईचा मारेकरी मुलगा हिमांशू याला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देदासाई तिराहे येथून अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारागृहात रवानगी करण्यात आली. हिमांशूने ऑनलाईन गेमिंगमध्ये 4 लाख गमावल्याचे आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिनेही गुपचूप विकल्याचे समजताच आई-वडिल त्याच्यावर ओरडले होते. दागिने परत आणण्यासाठी ते त्याच्यावर दबाव टाकू लागले होते. याच त्रासाला कंटाळून, तसेच आपल्या वडिलांनी आईच्या नावावर 50 लाखाचा विमा घेतल्याचे त्याला समजले होते व हे विम्याचे पैसे मिळावे म्हणून हिमांशूने संधी मिळताच दुपारी आई प्रेमादेवी यांचा दोरीने गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह पेंढ्याच्या गोणीत भरून यमुना नदीच्या काठावर फेकून दिला.