शिक्षण तर पूर्ण झालं नाही… आता पुढे काय करु? अशा कॅप्शन सोबत एक मजेशीर पोस्ट स्मृती इराणी यांनी आज सोशल मीडियावर केली आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. मात्र आज शेअर केलेला त्यांचा फोटो सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी आज मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.
विशेष म्हणजे फोटोसोबत त्यांनी लिहिलेल्या ओळींनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. "सोच रहे हैं पढाई पूरी करी नहीं, आगे क्या करें!" असा लिहिल्याने अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट करताना स्मृती इराणी यांचं कौतुक केलं आहे.
पाहा त्यांची पोस्ट,
इंडियन न्यूट्रिशन ऍग्रीकल्चर या फंडची सुरुवात स्मृती इराणी आणि बिल गेट्स यांच्या हस्ते करण्यात आली. या फंडाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे सर्व प्रकारचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कुपोषणावर नियंत्रण ठेवणे. या कार्यक्रमानंतर स्मृती इराणी यांचा हा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला.
या फोटोमागची खरी कहाणी म्हणजे स्मृती इराणी आणि बिल गेट्स हे दोघंही शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. स्मृती इराणी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण झालेलं नाही. तर जगातले सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी देखील शिक्षण अर्ध्यावर सोडलं आहे.