Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

दादरा आणि नगर हवेली (Dadra and Nagar Haveli) या केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा (Silvassa) शहरात एका महिला कंडक्टरने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिकिटाचे पैसे चोरल्याचा आरोप झाल्यानंतर स्मार्ट सिटी बस सेवेच्या या कंडक्टरने आपले जीवन संपवले. पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. सरस्वती भोया (23) हिने शनिवारी दुपारी बरडपाडा गावात राहत्या घरी गळफास लावून घेतला, असे सिल्वासा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेच्या निषेधार्थ रविवारी बससेवेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद पाडल्याने शहरातील नागरिकांची गैरसोय झाली. मृत महिलेचे वडील सोनत भोया यांनी सांगितले की, सरस्वतीवर चोरीचा आरोप झाल्यानंतर तिची नोकरी चौकशीसाठी थांबवण्यात आली होती.

सोनत भोया यांनी पुढे सांगितले की, ‘सरस्वतीने ती निर्दोष असल्याचा दावा केला होता. ती निर्दोष असल्याचा दावा करण्यासाठी मला बस मॅनेजरला भेटायला घेऊन गेली होती. मात्र, तिचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी मॅनेजरने तिचा अपमान केला. या घटनेमुळे अस्वस्थ होऊन तिने घरी जाऊन आत्महत्या केली.’पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (हेही वाचा: Manipur Violence: मणिपूर हिंसाचार; आयटी विभागाच्या अधिकाऱ्याची घरात घुसुन हत्या)

ही महिला स्मार्ट सिटी बस सेवा चालवण्याच्या कंत्राटी एजन्सीची कर्मचारी होती, असे सिल्वासा स्मार्ट सिटीचे सीईओ चार्मी पारेख यांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीनंतरच आत्महत्येचे खरे कारण समजेल, असेही त्यांनी सांगितले.