Sexual Content YouTube: यूट्यूबवर 'अश्लील कंटेंट' पाहून मन झाले विचलित; आता परीक्षेत नापास झाल्यानंतर 75 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव
YouTube (PC - pixabay)

मध्य प्रदेशातील एका तरुणाने परीक्षेत नापास झाल्याबद्दल गुगल इंडियाला जबाबदार धरत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यूट्यूबवर (YouTube) चालणाऱ्या अश्लील जाहिरातींमुळे (Sexual Content) परीक्षेत नापास झाल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याला 75 लाखांची भरपाई मिळवून द्यावी अशी त्याची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालय आपली अडचण समजून घेईल आणि आपल्या बाजूने निर्णय देईल अशी त्यांची अपेक्षा असली तरी, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एएस ओका यांच्या खंडपीठाने ही याचिका अत्याचारी असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, ही याचिका म्हणजे एक वाइअत विनोद आहे. यूट्यूब बघायचे नसेल तर बघू नका पण अशा प्रकारे नुकसान भरपाई मागणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. इतकेच नाही तर याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. परंतु याचिकाकर्त्याने विनंती केली की, तो बेरोजगार आहे, त्यामुळे त्याचा दंड माफ करावा. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दंडाची रक्कम 25 हजार रुपये केली.

आनंद प्रकाश चौधरी नावाच्या विद्यार्थ्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की, यूट्यूबवरील अश्लील जाहिरातींमुळे त्याचे लक्ष विचलित झाले आणि तो मध्य प्रदेश पोलिसांच्या भरती परीक्षेत पास होऊ शकला नाही. या बदल्यात यूट्यूबने त्याला 75 लाखांची भरपाई द्यावी. एवढेच नाही तर सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत युट्युबवर अशा जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणीही तरुणाने  केली होती. (हेही वाचा: Karnataka: तरुणीचा खाजगी व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील तरुणाला अटक)

तरुणाच्या म्हणण्यानुसार, त्याच्यासारखे इतरही लोक आहेत जे परीक्षेची तयारी करत आहेत. अशा जाहिरातींमुळे त्यांचेही नुकसान होत आहे. अशा जाहिरातींद्वारे समाजात अश्लीलतेलाही चालना मिळते, असे त्याचे म्हणणे आहे.