Photo Credit- X

Madhukar Pichad Dies: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झाले (Madhukar Pichad Passed Away)आहे. पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज 6 डिसेंबर रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मधुकर पिचड अहिल्यानगर अकोले विधानसभा मतदारसंघातून सात वेळा आमदार राहिले होते. त्यांनी अनेक महत्वाची पदे भुषवली आहेत. आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून देखील त्यांनी कार्यभार पाहिला होता. 2029 मध्ये मधुकर पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला.

मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास

अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून 1972 ला त्यांची निवड झाली. 1972 ते 1980 पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड झाली. 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. 1995ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती. राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही मधुकर पिचड यांनी धुरा सांभाळली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते. 2014 मध्ये अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले. 2019 ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला. मधुकर पिचड यांनी 1961 मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. मधुकर पिचड यांनी 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला. आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती.

दिलीप वळसे पाटलांनी वाहिली श्रद्धांजली

“विधिमंडळातील आमचे जुने सहकारी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. या कठीणप्रसंगी मी त्यांच्या परिवाराप्रती सहवेदना व्यक्त करतो व पिचड कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.