Satyendar Jain Health Updates: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा प्लाझ्मा थेरपीला सकारात्मक प्रतिसाद; प्रकृतीमध्ये सुधारणा
File Image Of Delhi Health Minister Satyendar Jain | Photo Credits: Twitter/ ANI

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. अत्यावस्थ असलेल्या सत्येंद्र जैन यांना देण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरपीला (Plasma Therapy) त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. दरम्यान त्यांचा ताप उतरला असून ऑक्सिजनच्या स्तरामध्येही सुधारणा झाली आहे. डॉक्टर उद्या (22 जून) त्यांना प्रकृती पाहून जनरल वॉर्डमध्ये दाखल करू शकतील अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी 17 जून दिवशी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 55 वर्षीय सत्येंद्र जैन यांना दिल्लीच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याने अखेर 19 जून दिवशी त्यांच्यावर मॅक्स हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. आता त्यांचा त्रास कमी झाला आहे. प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती.

ANI Tweet

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीदेखील कोरोना सदृश्य लक्षणांमुळे कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. सध्या सत्येंद्र जैन यांच्याकडील पदाची जबाबदारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे देण्यात आली आहे. दिल्लीमध्येही सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे स्थिती चिंताजनक आहे.