सातारा जिल्हा बँक निवडणुकीत (Satara District Bank Election) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा झालेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गांभीर्याने घेतला आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सातारा येथे जाऊन शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर थेट भाष्य केले. तसेच, कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला. 'शशिकांत शिंदे यांनी ही निवडणुक अधिक गांभीर्याने घ्यायला हवी होती', असेही पावर या वेळी म्हणाले. दरम्यन, शरद पवार यांनी सातारा राष्ट्रवादीत असलेल्या अंतर्गत बंडाळीबाबतही नेत्यांना कानपिचक्या दिल्याचे बोलले जात आहे.
ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव केला. त्यानंतर शिंदे यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. या घटनेनंतर शरद पवार यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीस शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या कृतीबद्दल शशिकांत शिंदे यांनी दिलगीरी व्यक्त केली. तर शिंदे यांच्या पराभवाबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शरद पवार यांना पत्रकारांनी शशिकांत शिंदे यांच्या पराभवाविषयी विचारले. यावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, 'मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. पण मला असं वाटतं की शिंदेंनी ही निवडणूक अधिक गांभीर्यानं घ्यायला हवी होती.' (हेही वाचा, Satara District Bank Election Result: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक, शशिकांत शिंदे यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी)
शशिकांत शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी झालेल्या पराभवाविषयी विचारले असता, शिंदे म्हणाले, ज्यांना मी मोठे केले त्यांनी मलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये. आतापर्यंत मी पक्षाच्या बंधनात होतो. मला पक्षाची चौकट होती. आता मी मुक्त झालो आहे. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जावळी तालुक्यात वाढविण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहे. त्यांनी त्यांची ताकद लावावी. मी माझी ताकद लावेन, असा इशाराही शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना दिला.
शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीतीलच काही जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा छुपा विरोध होता. त्यांनीच शिंदे यांच्या विरोधकांना फुस लावली. तसेच, शिवेंद्र राजे भोसले यांचे बंधु खासदार उदयनराजे भोसले यांनीही शशिकांत शिंदे यांच्या विरोधकांना तसेच ज्ञानदेव रांजणे यांना मदत केल्याची चर्चा साताऱ्याच्या राजकारणात रंगली आहे.