Saree Controversy: साडीवरून झालेला वाद अंगाशी आला; दिल्लीतील Aquila रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश, विनापरवाना चालू होते
Aquila Restaurant (Photo Credits: Twitter@barkhatrehan16)

काही दिवसांपूर्वी दक्षिण दिल्लीच्या (South Delhi) अंसल प्लाझामध्ये असलेल्या अक्विला नावाच्या रेस्टॉरंटमध्ये (Aquila Restaurant) साडी नेसून आलेल्या महिलेला प्रवेश न दिल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता रेस्टॉरंटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने (SDMC) हे रेस्टॉरंट सील करण्याची नोटीस जारी केली आहे. तपासादरम्यान, असे आढळून आले आहे की रेस्टॉरंटकडे SDMC द्वारे जारी केलेला वैध परवाना नाही.

दक्षिण MCD च्या सेंट्रल झोनच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या नोटीसनंतर, अक्विला ईटिंग हाऊसच्या वतीने कुणाल छाबरा यांनी मान्य केले की रेस्टॉरंट चालवण्यासाठी आवश्यक परवाना नाही. जोपर्यंत परवाना मिळत नाही, तोपर्यंत ते रेस्टॉरंट बंद करत आहेत. या संदर्भात, रेस्टॉरंट ऑपरेटरने MCD कडून जारी करण्यात आलेल्या नोटिसासह प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे.

24 सप्टेंबरच्या क्लोजर नोटीसमध्ये म्हटले आहे की, क्षेत्र सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांना 21 सप्टेंबर रोजी तपासणी दरम्यान आढळले की, या रेस्टॉरंटमधील  सुविधा हेल्थ ट्रेड परवान्याशिवाय आणि अस्वच्छ परिस्थितीत चालू आहे. तसेच त्यांनी सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमणही केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता., ज्यात एक साडी नेसलेली महिला दिल्लीतील अक्विला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र फक्त तिने साडी नेसली आहे म्हणून तिला प्रवेश दिला जात नाही असे दिसत आहे. अवघ्या 10 सेकंदांची ही क्लिप पाहून अनेकांनी या रेस्टॉरंटच्या ड्रेस कोडच्या धोरणाबाबत आक्षेप नोंदवला होता. तसेच या रेस्टॉरंटवर टीकाही केली होती.

त्यानंतर रेस्टॉरंटने आपले स्टेटमेंट जारी करत, त्यावेळी त्या 1 तासामध्ये नक्की काय घडले स्पष्ट केले आहे. स्टाफ मेंबरने केलेल्या वक्त्यव्याबाबत माफी मागत, ‘साडी नेसलेल्या महिलेस प्रवेश नाही’ असे आमचे कोणतेही धोरण नसल्याचे स्पष्ट केले होते. (हेही वाचा: साडी नेसून आल्याने रेस्टॉरंटमध्ये मिळाली नाही एन्ट्री? वादानंतर Aquila Restaurant ने सांगितले नक्की काय घडले, See Post)

एसडीएमसीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत, अँड्र्यूज गंजमधील काँग्रेसचे नगरसेवक अभिषेक दत्त यांनी हा कपड्यांचा मुद्दा उपस्थित केला. पारंपरिक भारतीय पोशाख घातलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाकारणाऱ्या कोणत्याही रेस्टॉरंट, बार किंवा हॉटेलवर 5 लाख रुपये दंड आकारण्याची मागणी करणारा प्रस्ताव त्यांनी मांडला.