Reshimbagh | (PC: twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत नागपूर (Nagpur) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS ) संघाच्या रेशीमाबग (Reshimbagh) मुख्यालयाला भेट दिली. या भेटीवरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्विटर करत टीका केली आहे. हा फोटो शेअर करताना ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते', असे म्हणत टोलाही लगावला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील कार्यालयावर सांगितलेल्या दाव्याची पार्श्वभूमी आहे.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते. जय महाराष्ट्र! (हेही वाचा, BMC: मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालयं सील, कारण घ्या जाणून)

उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात मुंंबई महापालिकेमध्ये काल (28 डिसेंबर) जोरदार राडा पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, शितल म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुंबई महापालिकेत पोहोचले. या गटाने पालिकेतील शिवसेना कार्यालयावर दावा सांगितला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्याला तीव्र विरोध झाला. महापालिकेत अभूतपूर्व स्थिती पाहायला मिळाली. पालिकेतील सुरक्षा करमाचऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. त्यामुळे संभांव्य संघर्ष टळला.

ट्विट

दरम्यान, शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटातील राडा प्रकरणानंतर मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या आदेशाने बीएमसी कार्यालयातील सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही कार्यालये बंदच राहणार आहेत.