मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आयुक्त इक्बालसिंह चहल ( BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्या आदेशाने बीएमसी कार्यालयातील सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये (BMC Political Party Office) सील करण्यात आली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही कार्यालये बंदच राहणार आहेत. ही कारवाई करण्यास कारण ठरला आहे शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटातील राडा.
मुंबई महापालिका इमारतीत काल अभूतपूर्व स्थिती पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, शितल म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुंबई महापालिकेत पोहोचले. या गटाने पालिकेतील शिवसेना कार्यालयावर दावा सांगितला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्याला तीव्र विरोध झाला. महापालिकेत अभूतपूर्व स्थिती पाहायला मिळाली. पालिकेतील सुरक्षा करमाचऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. त्यामुळे संभांव्य संघर्ष टळला. त्यामुळे पालिका आयुक्तांनी कार्यवाही करत सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये सील करण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय तात्पूरत्या स्वरुपाचा असणार आहे. (हेही वाचा, Thackeray Vs Shinde Fraction in Mumbai: मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून शिंदे गट ठाकरे गट आमने सामने; पुन्हा राडा)
दरम्यान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह नरेश म्हस्के, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि गिरीश धानुरकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत सुरुवातीला मुंबई महापालिका आयुक्त आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला मोर्चा पालिकेतील शिवसेना कार्यालयाकडे वळवला. कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत घोषणाबाजी सुरु झाली. ही बातमी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनीही महापालिका कार्यालयात धाव घेतली. या वळी दोन्ही गट आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. प्रकरण हाताबाहेर जाणार असेल लक्षात येताच पालिकेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनाही या प्रकाराची माहिती मिळाली मुंबई पोलीस आणि महापालिकेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिका इमारतीबाहेर काढले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटातील संघर्ष कोणते टोक गाठणार याची चर्चा पालिकेत रंगली आहे. घडल्या प्रकारानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्वच पक्षाची कार्यालये सील करण्याचा निर्णय घेतला.