महाराष्ट्रात शिंदे विरूद्ध ठाकरे गटाच्या सामन्याचा पुन्हा एक नवा प्रत्यय आज बीएमसी मुख्य कार्यालयामध्ये (BMC Head Office) आला. बीएमसी मधील शिवसेनेचं कार्यालय (Shiv Sena Office) कुणाचं? यावरून दोन्ही गटांनी आज राडेबाजी केली आहे. यापूर्वी हिवाळी अधिवेशनातही कार्यलायाच्या ताब्यावर राडेबाजी टाळण्यासाठी त्याची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पण शिंदे गट आज आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर आक्रमक होत कार्यालयावर ताबा मिळवण्यासाठी पुढे सरसावलेला दिसला.
बीएमसी कार्यालयामध्ये बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव हे नेते उपस्थित होते. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सगळ्यांना बाहेर काढण्यात आले.
शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाणे, डोंबिवली सोबतच अनेक स्थानिक पक्ष कार्यालय आणि शिवसेना शाखांवरून राडे झाल्याचे पहायला मिळाले आहेत. पक्ष फूटल्यानंतर आमदार, खासदार दोन गटात विभागले गेल्याचं स्पष्ट पहायला मिळाले आहे. पण नगरसेवकांमध्ये समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव शिंदे गटासोबत गेलेले पहायला मिळाले आहे. त्यामुळे सध्या फारच तुरळक माजी नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्यामुळे सध्या बीएमसीमधील कार्यालय कुणाचं यावरून वातवरण तापलेलं पहायला मिळत आहे.
शिवसेनेतील फूटीनंतर धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षावर खरा हक्क कुणाचा हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अद्याप त्यावर कोर्टाचा निकाल आलेला नाही.