संजय निरुपम यांचा निर्वाणीचा इशारा; काँग्रेस पक्षात बदल न झाल्यास ठोकणार रामराम
Sanjay Nirupam (Photo Credits: ANI)

काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी पक्षाच्या कामकाजावर सवाल करत ही परिस्थिती न बदलल्यास पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा इशारा दिला होता. आज ही आपल्या या निर्णयावर पुन्हा भाष्य करत आपण विधानसभा निवडणूकीसाठीच्या (Maharashtra Assembly Elections) प्रचारात देखील सहभाग घेणार नसल्याचे सांगितले आहे. आज, निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना सुद्धा निरुपम यांना तिकीट मिळाले नाही, त्यामुळे साहजिकच यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट असल्याचे सरळ आहे. याच पार्श्वभूमीवर आज निरुपम यांनी काँग्रेसला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.

संजय निरुपम यांनी काल सुद्धा अशाच प्रकाराने ट्विट करत काँग्रेस पक्षाला माझ्याकडून करण्यात येणारी जनसेवा नकोशी झाली आहे. मी विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाकडे मुंबईतील फक्त एक जागा मागितली होती पण ती सुद्धा पक्षाकडून देण्यात आली नाही अशा शब्दात खेद व्यक्त केला होता. आज सुद्धा एका पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्याला पक्ष सोडण्याची इच्छा नाही मात्र ही परिस्थिती न बदलल्यास मी जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहीन असे वाटत नसल्याचे म्हंटले आहे. तसेच आपण यंदा निवडणुकीच्या प्रचारात देखील सहभाग घेणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीचा उमेदवार अर्ज भरण्याचं शेवटचा दिवस आहे. भाजपा सहित अन्य पक्षातील अनेक मान्यवरांनी अर्ज भरून आपले स्थान निश्चित केले आहे. तर दुसरीकडे सर्वच पक्षातील काही दिग्गज नेत्यांना सरळ डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये भाजपातून विनोद,तावडे चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसमधून संजय निरुपम यांचा समावेश आहे.