Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव रुग्णालयात दाखल
Mulayam Singh Yadav | (Photo Credits: ANI)

समाजवादी पक्ष (Samajwadi Party) संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना बुधवारी (1 जुलै) दुपारच्या सुमारास गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून मुलायम सिंह यांच्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे मेडीकल बुलेटीन जारी करण्यात आले नाही. 81 वर्षांचे असलेले ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना वृद्धापकाळामुळे जाणवणाऱ्या त्रासावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशातील एक मोठे नेते आहेत. ते तीन वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी राहिले आहेत. 1 जून 1996 ते मार्च 1998 या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रालय सांभाळले आहे.

मुलायम सिंह यादव पाठिमागील काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पाठीमागील वर्षी मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग (Urinary tract infections) झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाठिमागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलायम सिंह यादव हे कोरोना व्हायरस संक्रमितही झाले होते. त्यांचे चिरंजीव आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करुन याची माहिती दिली होती. मुलायम सिंह यांचे पूत्र अखिलेश यादव हे देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पुढील वर्षी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ते सध्या तयारी करत आहेत. त्यांचा समाजवादी पक्ष जोरदार कामाला लागला आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh Assembly Election 2022: भीम आर्मी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची चिंता वाढवणार? भाजप विरोधात समाजवादी पक्ष, RLD सोबत आघाडीचे संकेत)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रमुख सामना भाजप आणि समाजवादी पक्षात रंगण्याची चिन्हे आहेत. काही महिन्यांपूर्वीच अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, उत्तर प्रदेशची जनता आता बदल पाहू इच्छिते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष युती करुन लढतील, अशीही चर्चा होती. अखिलेश यादव यांनी अशा प्रकारच्या युतीबाबतच्या चर्चेच्या वृत्ताचे खंडण केले होते. आम्ही छोट्या पक्षांसोबत लढणार आहोत. मोठ्या पक्षांसोबतचा माझा अनुभव तितका चांगला नाही, असेही अखिलेश यांनी काँग्रेसचे नाव न घेता म्हटले होते.