समजेना झालंय, काँग्रेसने सरकार चालवले की, मिशेल मामाचा दरबार: नरेंद्र मोदी
Pm Modi hits out at Congress in Baripada Odisha | (Photo courtesy: ANI)

ओडीसामधील (Odisha) बारीपदा (Baripada) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी काँग्रेसवर (Congress ) जोरदार हल्ला चढवला. खास करुन ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, आता हेच कळेना झालंय की, काँग्रेसने सरकार चालवले की, मिशेल मामाचा दरबार. ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणातील आरोपी ख्रिश्चन मिशेल (Christian Michell) याच्या अटकेचा आपल्या भाषणात पुरेपूर वापर करत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. (हेही वाचा, ऑगस्टा वेस्टलॅंड: 'हड्डीवाला कुत्ता' कोण? ख्रिश्चन मिशेल याची डायरी सीबीआयच्या हाती)

आपल्या भाषणात मोदी म्हणाले, मिशेलच्या डायरीमुळे काँग्रेसचा पोलखोल झाला. तपासात पुढे येत आहे की, ख्रिश्चन मिशेल आणि काँग्रेस सरकारमधील मोटे नेते आणि मंत्र्यांची खास जवळीक होती. पंतप्रधान कार्यालयातून कोणती फाईल कुठे गेली आणि कशी गेली याची माहिती आरोपीला मिळत असे. या प्रकरणात आता सत्य समोर येत आहे. म्हणून काँग्रेस नाराज आहे. प्रसारमाध्यमांतून एक रिपोर्ट आला आहे. हेलीकॉप्टर घोटाळ्यात आरोपी असलेल्या मिशेलच्या एका चिठ्ठीबाबत यात छापण्यात आल्याचेही मोदींनी या वेळी सांगितले.

2004 ते 2014 या काळात देशाच्या लष्कराला कमजोर करण्याचा कट रचण्यात आला. आता देश पाहतोही आणि समजतोही आहे. आता या कटातून आमचे सरकार लष्कराला बाहेर काढत आहे. म्हणूनच आता आम्ही यांना खटकू लागलो आहे. आज मी स्पष्ट सांगू इच्छितो की, देशाच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देण्यात ज्या लोकांचा सहभाग राहिला आहे, त्या सर्वांची चौकशी तपास यंत्रणा करेन, असेही मोदींनी या वेळी आपल्या भाषणात सांगितले.