Telangana Tunnel Collapse Update (फोटो सौजन्य - ANI)

Telangana Tunnel Collapse Update: तेलंगणातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल बोगद्यात (Srisailam Left Bank Canal) शनिवारी 8 कामगार अडकले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी रविवारी सकाळीही बचाव कार्य सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची टीम घटनास्थळी उपस्थित असून बोगद्यात ढिगारा आणि साचलेल्या पाण्यामुळे एनडीआरएफ टीमला बचाव कार्यात काही अडचणी येत आहेत. एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट सुखेंदु दत्ता म्हणाले की, पथकाने बोगद्याच्या आत सुमारे 13.5 किमी अंतर कापले आहे, प्रामुख्याने लोकोमोटिव्ह आणि कन्व्हेयर बेल्टचा वापर केला आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दत्ता यांनी सांगितले की, काल रात्री 10 वाजताच्या सुमारास आम्ही परिस्थिती काय आहे ते पाहण्यासाठी आत गेलो. बोगद्यात प्रवेश करण्यासाठी लोकोमोटिव्हचा वापर करण्यात आला. आम्ही बोगद्याच्या गेटपासून सुमारे 13.5 किमी अंतर कापले. आम्ही 11 किमी अंतर ट्रेनने कापले आणि नंतर उर्वरित 2 किमी कन्व्हेयर बेल्टने आणि पायी प्रवास केला.

कोसळलेल्या भागाचा शेवटचा 200 मीटर भाग पूर्णपणे ढिगाऱ्यांनी व्यापला आहे. यामुळे, अडकलेल्या कामगारांची स्थिती किंवा त्यांचे नेमके स्थान निश्चित करणे कठीण झाले आहे. आम्ही टनेल बोरिंग मशीन, टीबीएमच्या शेवटी पोहोचलो होतो. बोगद्याच्या आत ओरडून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अडकलेल्या कामगारांकडून प्रतिसाद मिळविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. जोपर्यंत ढिगारा साफ होत नाही तोपर्यंत बोगद्यात अडकलेल्या कामगारांची नेमकी स्थिती कळू शकत नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. (हेही वाचा - Telangana Tunnel Collapse: तेलंगणात मोठी दुर्घटना! SLBC बोगद्याच्या छताचा काही भाग कोसळला; 6 कामगार अडकल्याची भीती)

बोगद्यातून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू -

बोगद्यात साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी एनडीआरएफची टीम काम करत आहे. 11 ते 13 किलोमीटर दरम्यानचा भाग पाण्याने भरलेला आहे, त्यामुळे आम्ही सध्या पाणी काढून टाकण्याच्या प्रक्रियेत आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर, आम्ही बचाव कार्य सुरू करू. यापूर्वी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ दोन्ही पथकांना कोसळलेल्या भागात पोहोचण्यात गंभीर आव्हानांचा सामना करावा लागला.

दरम्यान, एसडीआरएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'बोगद्यात प्रवेश करण्याचा कोणताही मार्ग नाही. तो पूर्णपणे कोसळला आहे आणि गुडघ्यापर्यंत चिखलाने भरलेला आहे. तथापी, शनिवारी सकाळी तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील डोमलपेंटाजवळील एसएलबीसी बोगद्याच्या बांधकामाधीन भागाच्या छताचा तीन मीटर भाग कोसळला. 14 किलोमीटर लांबीच्या बोगद्यात 8 कामगार अडकले आहेत.