कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे सध्या देशात लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे, अशात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील जवळ जवळ सर्व कंपन्यांमध्ये पगार कपातीचा (Pay Cuts) निर्णय घेण्यात आला आहे. आता भारतातील एक मोठा उद्योगसमूह रिलायन्सनेही (Reliance Industries) कर्मचार्यांचे पगार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या समूहाने याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण मंडळाच्या व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पगार 30 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या निवेदनानुसार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पगार घेणार नाहीत. याबाबत कंपनीने सांगितले आहे की, 'कोरोनाच्या संकटामुळे हायड्रोकार्बन (Hydrocarbons) व्यवसायाला वाईट दिवस आले आहेत. जगभरात रिफाइंड उत्पादने आणि पेट्रोकेमिकल्सची मागणी कमी झाली आहे, यामुळे आमच्या हायड्रोकार्बन व्यवसायावरही त्याचा थेट परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांगीण खर्च कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.' (हेही वाचा: Coronavirus Crisis: जगभरातील 1.6 अब्ज कामगार बेरोजगार होण्याच्या मार्गावर; कोट्यवधी व्यवसाय होऊ शकतात बंद, ILO ने व्यक्त केली भीती)
मात्र या निर्णयामध्ये कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, ज्यांचा पगार वर्षाला 15 लाख पर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांना वेतन कपातीपासून दूर ठेवण्यात आले आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असणार्या कर्मचार्यांसाठी निश्चित वेतनातील 10% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह कर्मचार्यांचा वार्षिक रोख बोनस आणि इतर कामगिरीवर आधारित इंसेंटिव्ह देखील थांबविला गेला आहे. यावेळी कंपनी म्हणाली, ‘आम्ही व्यवसाय वातावरणातील या मोठ्या बदलावर लक्ष ठेवून आहोत. संकटाच्या वेळी आम्ही स्वत: चे मूल्यांकन करीत आहोत आणि आपली क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’