Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेकसाठी (Ram Temple Pran Pratishtha Ceremony)  संपूर्ण देश उत्सुक आहे. लोक या ऐतिहासिक दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. या मुद्द्यावरून बरेच राजकारणही सुरू आहे. याआधी विरोधी राजकीय पक्ष आणि शंकराचार्य यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते, आता सर्वसामान्य नागरिकही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या भोला दास नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अभिषेक करण्यावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.

भोला दास यांचे म्हणणे आहे की, सध्या पौष महिना सुरू असून हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जात नाही, अशा स्थितीत रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करू नये. न्यायालयाने 22 जानेवारी रोजी होणारी ही गोष्ट गोष्ट थांबवावी. याशिवाय याचिकाकर्त्याने असेही म्हटले आहे की, राम मंदिराचे बांधकाम अद्याप सुरू आहे, मंदिर पूर्णपणे बांधले गेले नाही. त्यामुळे तेथे देवता विराजमान होऊ शकत नाही व अशी प्राणप्रतिष्ठा ही सनातन परंपरेशी विसंगत असेल.

भोला दास यांनी आपल्या याचिकेत शंकराचार्यांचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, शंकराचार्यांनीही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. अपूर्ण असलेल्या मंदिरातील मूर्तीचा अभिषेक करण्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत हा सोहळा तूर्तास थांबवावा. यासह याचिकाकर्ते भोला दास यांनी याचिकेत भाजपवर आरोपही केले आहेत. भाजप राम मंदिरावर राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी पक्ष अपूर्ण असलेल्या रामलल्ला मंदिरात अभिषेक घालत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा: Sharad Pawar On Ayodhya Ram Mandir Visit: 'अयोध्येला मी नक्की येणार, पण 22 जानेवारीनंतर...' शरद पवारांचं श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र)

पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनीही राम मंदिराच्या पावित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते. चारही शंकराचार्यांनी या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद म्हणाले होते की, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही शुभ मुहूर्तानुसारच करावी. या मुद्द्यावर विरोधी पक्ष सुरुवातीपासूनच भाजपवर हल्लाबोल करत आहेत. लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजप राम मंदिराचा वापर करत असल्याचे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षासह इतर सर्व विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर भाजपने प्रभू रामाचे अपहरण केल्याचे म्हटले होते.