पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम (Ram Rahim) खरा की खोटा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच्या तपासासंदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सोमवारी (आज) सुनावणी झाली. चंदिगड, पंचकुला आणि अंबाला येथील काही भाविकांच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली. उत्तर प्रदेशातील बागपत येथील आश्रमात पोहोचलेला राम रहीम हा खोटा असल्याचा संशय भक्तांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी 'बाबा लव्ह चार्जर' राम रहीमचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो बागपत आश्रमातील आंब्याच्या झाडाजवळ बोलताना दिसत होता. मात्र काही समर्थकांनी तो बनावट राम रहीम असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली. हे डेरा सच्चा सौदा व्यवस्थापनाचे भक्तांची दिशाभूल करण्याचे षड्यंत्र असल्याचे याचिकेमध्ये म्हटले होते.
मात्र सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले. ‘कोरोना महामारीच्या काळात तुम्ही एक काल्पनिक चित्रपट पाहिला आहे, असे दिसते त्यामुळेच अशी याचिका दाखल करण्यात आली आहे,’ असे न्यायालयाने म्हटले. त्यानंतर न्यायमूर्तींनी ही याचिका फेटाळली. यावर याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, व्हिडीओमध्ये जो राम रहीम बोलताना दिसत आहे, त्याची उंची एक इंच वाढली आहे. वयाच्या पन्नाशीनंतर उंची कशी वाढू शकते? असा प्रश्न वकिलाने उपस्थित केला. यावर त्याची उंची वाढली की नाही, याचा तुम्हाला काय फरक पडतो? असे न्यायाधीश म्हणाले.
डेरातर्फे वकील जितेंद्र खुराणा यांनी सांगितले की, एक विशिष्ट गट आहे जो जाणीवपूर्वक अशी याचिका दाखल करत आहे. 2019 मध्येही अशी याचिका दाखल केली होती, त्यानंतर कोर्टाने त्यांना 50000 चा दंड ठोठावला होता. चंदीगडचे रहिवासी अशोक कुमार यांनी याचिका दाखल करून अनेक युक्तिवाद केले होते. आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: खासदारांनी लुटला मोफत रेल्वे प्रवासाचा आनंद; 5 वर्षात केले 62 कोटींचे बिल; माहिती अधिकारात खुलासा)
दरम्यान, गुरमीत राम रहीम सिंगला हरियाणा सरकारने एका महिन्यासाठी पॅरोल दिला आहे. 2002 मध्ये त्याच्या मॅनेजरच्या हत्येप्रकरणी तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, यासह 2017 मध्ये दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरल्यानंतर तो 2017 पासून हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात बंद आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. यापूर्वी, त्याच्या आजारी आईला भेटण्यासह तो चार वेळा तुरुंगातून बाहेर आला आहे.