Rajasthan Crime: अनैतिक संबंध किंवा त्याबाबत संशय अथवा हुंडा, चोरी अशा वेगवेगळ्या कारणावरुन पतीने पत्नीची हत्या (Man Kills Wife) केल्याच्या घटना या आधी अनेकदा घडल्या आहेत. पण, पत्नी फोनवरुन कथीतरित्या आत्म्याशी संवाद (Communicating With Spirits) साधते या संशयावरुन हत्या केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे काय? बहुदा नसेलच. पण असे घडले आहे. राजस्थान राज्यातील (Rajasthan) बाडमेर (Barmer) जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीची याच संशयावरुन हत्या केली आहे. आपली पत्नी फोनद्वारे अज्ञात आत्माशी संवाद साधते असा त्याला संशय होता. चुन्नीलाल असे आरोपीचे नाव असून त्याने बुधवारी पहाटे त्याची पत्नी जिओ देवी (40) झोपेत असताना तिच्यावर हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात समोर आले आहे की चुन्नीलालला संशय होता की त्याची पत्नी आत्म्याशी संबंध ठेवत आहे आणि ती तिच्या मोबाइल फोनद्वारे त्याच्याशी बोलत आहे. पहाटे अडीचच्या सुमारास या निर्घृण हत्येचा उलगडा झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या किंकाळ्या ऐकून दाम्पत्याची 17 वर्षांची मुलगी सुमित्रा जागी झाली. तिने पाहिले की, आपले वडील आईची हत्या करत आहेत. वडिलांना आवरण्याचा आणि आईचे प्राण वाचविण्यासाठी तिने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण चुन्नीलालने मुलीवरही हल्ला केला. कुऱ्हाडीने वार केल्याने सुमित्रा जखमी झाली. गोंधळामुळे सावध झालेल्या शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्याचे दिसले. त्यांनी तातडीने पीडितांना जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी जियो देवी यांना मृत घोषित केले. सुमित्रा यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुन्नीलाल, जिओ देवी आणि त्यांच्या चार मुलांचा समावेश असलेल्या कुटुंबाने मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी एकत्र जेवण केले. चुन्नीलालने मध्यरात्री जागून हे हिंसक कृत्य केले. पहाटे तीनच्या सुमारास शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुमित्रा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चुन्नीलालला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. जिओ देवी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पती पत्नीच्या भांडणाचे अनेक प्रकार आणि घटना या आधीही पुढे आल्या आहेत. त्यातील काही अतिशय भयावह असतात मात्र आत्म्याशी संवाद साधत असल्याच्या संशायून हत्या करणे ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. असेही सांगितले जात आहे की, आरोपी चुन्नीलाल हा मानसिक रोगी होता. त्याने त्यातूनच पत्नीची हत्या केली असावी.