राजस्थानच्या (Rajasthan) कोटा (Kota) जिल्ह्यात चंबळ नदीत (Chambal River) सुमारे 45 यात्रेकरूंची बोट पलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. आधीच खराब झालेल्या बोटीमध्ये तब्बल 45 लोक प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक डझन महिला आणि सुमारे अर्धा डझन मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरु होऊन 19 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. त्याच वेळी, 10 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. सध्या अनेक लोक बेपत्ता आहेत. हरवलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. परिस्थिती लक्षात घेता कोटा येथील डॉक्टरांच्या पथकाला बोलावून घटनास्थळावर शवविच्छेदन करण्यात आले.
बुंदी जिल्ह्याच्या सीमेवर गोठड़ा कला गावाजवळ चंबळ नदीत ही बोट पलटली. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी उज्ज्वल राठोड आणि पोलिस अधीक्षक शरद चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्याची देखरेख केली. मुख्यमंत्री अशोक गहलोत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्य स्वायत्त शासनमंत्री शांती धारीवाल यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.
#UPDATE: Chief Minister Ashok Gehlot announces an ex-gratia of Rs 1 Lakh each to the next of the kin of the people who died in the incident of boat capsize in Kota. https://t.co/aNi4aLOGMq
— ANI (@ANI) September 16, 2020
अपघातातील बळी पडलेले लोक हे एका जुन्या बोटीमधून जवळच्या कमलेश्वर धाम मंदिरात जात होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक होते आणि त्यात 10 मोटारसायकली आणि इतर सामान ठेवण्यात आले होते, यामुळे चंबळ नदीमध्ये बोट काही मैल दूर गेल्याने ती पलटली. अपघाताची माहिती मिळताच बचाव दल कोटा येथून रवाना करण्यात आले. प्रशासन येण्यापूर्वीच ज्यांना पोहायला येत होते अशा ग्रामस्थांनी नदीत उडी मारली आणि सुमारे 20 लोकांना सुखरूप बाहेर काढले. नंतर पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव मोहीम सुरु झाली. (हेही वाचा: सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या खून प्रकरणाचा लागला छडा, पंजाब पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीतील 3 सदस्यांना अटक
या अपघातानंतर, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली.