काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली. सूरत येथील कोर्टाने त्यांना ही शिक्षा ठोठावली. यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा (Priyanka Gandhi Vadra) यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, माझा भाऊ निर्भीड आहे. तो नेहमी सत्य आणि वास्तव बोलत आला आहे. तो या पुढेही निर्भीडच राहील. विरोधकांना घाबरलेली यंत्रणा साम, दाम, दंड भेद यांच्या माध्यमातून राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल गांधी यांना झालेल्या शिक्षेसंदर्भात सांगितले की, पक्ष कायद्यानुसार निकालाची लढाई करेल. राहूल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा काहीसा निर्णय येईल हे आम्हाला सुरुवातीपासूनच माहित होते कारण न्यायाधीश बदलत वारंवार राहिले. आमचा कायदा, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्ही कायद्यानुसार याविरोधात लढू. (हेही वाचा, Rahul Gandhi Guilty: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने ठरवले दोषी, 'मोदी आडनावा'बद्दल टिप्पणी भोवली)
न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत म्हणाले, "न्यायपालिका, ECI, ED यांच्यावर दबाव असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग होत आहे. सर्व निर्णय प्रभावाखाली घेतले जातात. अशा प्रकारच्या टिप्पण्या सामान्य आहेत. राहुल गांधी हे धैर्यवान आहेत आणि तेच एनडीए सरकारशी सामना करू शकतात."
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांना सत्य बोलण्याची आणि हुकूमशाहाच्या विरोधात आवाज उठवण्याची शिक्षा दिली जात आहे. हा नवा भारत आहे. जर तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवलात, तर सर्वांवर ईडी-सीबीआय, पोलिस आणि एफआयआर लादले जातील. राहुल गांधींनाही सत्य बोलल्याबद्दल आणि हुकूमशाहाच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल शिक्षा होत आहे", रमेश यांनी ट्विट केले आहे.