Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवलं आहे.  ही शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासातच लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींवर मोठी कारवाई केली आहे.  राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसने शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधींना गुरुवारी बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला होता. यानंतर वायनाडचे खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले.

काँग्रेसचे राज्य युनिट आणि आघाडीच्या संघटना देशभरात कार्यक्रम सुरू करतील आणि त्यांची सुरुवात सोमवारपासून देशव्यापी आंदोलनाने होईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले. वायनाडच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एनडी अप्पाचन म्हणाले की, निषेधाचा भाग म्हणून वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटी आज 'काळा दिवस' पाळणार आहे.

राहुल गांधींच्या पात्रतेबद्दल काँग्रेसने सरकारवर जोरदार निशाणा साधला, पक्षाने हा "भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस" ​​असल्याचे म्हटले आणि ही लढाई "कायदेशीर आणि राजकीय दोन्ही प्रकारे लढली जाईल असे ठामपणे सांगितले." विरोधी पक्षाने देखील आरोप केला की "राजकीय सूड" बुद्धीने ही कारवाई केली गेली आहे.

मात्र, भाजपने काँग्रेस खासदाराच्या अपात्रतेला कायदेशीर म्हटले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा निर्णय कायदेशीर असल्याचे सांगितले आणि त्याचा निषेध करून काँग्रेस न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा आरोप केला.