'मोदी आडनाव' (Modi Surname) टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात दाखल द्ध फौजदारी मानहानीच्या खटल्याचा निकाल गुजरतमधील सूरत कोर्टाकडून (Gujarat's Surat City Court ) येण्याची शक्यता आहे. हा निकाल येत्या 23 मार्च रोजी येऊ शकतो अशी माहिती त्यांचे वकील किरीट पानवाला (Kirit Panwala) यांनी सोमवारी (20 मार्च) वृत्तसंस्था पीटीआयला दिली. कोर्टाचा निर्णय येईल तेव्हा राहुल गांधी स्वत: कोर्टात हजर असतील, असेही वकिलांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत बोलताना कथीतरित्या म्हटले होते की, 'सर्व चोरांचे आडनाव मोदी हेच कसे काय असते?' राहुल गांधी यांच्या याच विधानावर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी जोरदार आक्षेप घेत तक्रार केली होती आणि न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
तक्रारदार पूर्णेश मोदी यांनी दावा केला आहे की, लोकसभा निवडणूक 2019 पूर्वी कर्नाटक राज्यातील कोलार येथील सभेतून बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन टिप्पणी केली. ज्यामुळे संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी झाली. दरम्यान, मुख्य न्यायदंडाधिकारी एच एच वर्मा यांच्या कोर्टाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तिवादाची सुनावणी पूर्ण केली आणि निकाल देण्यासाठी 23 मार्च ही तारीख निश्चित केली, असे वकिलांनी सांगितले. (हेही वाचा, Rahul Gandhi Statement: भाजपच्या माफीच्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया, वाचा नेमकं काय म्हणाले ?)
राहुल गांधी या प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीदरम्यना आतापर्यंत तीन वेळा न्यायालयात हजर राहिले. ऑक्टोबर 2021 मध्ये ते या सुनावणीसाठी कोर्टात शेवटचे हजर राहिले. यावेळी त्यांनी आपले म्हणने मांडले आणि आपण दोषी नसल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.