![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/07/Rafale-jet-380x214.jpg)
भारतीय राजकारणात राफेल व्यवहार (Rafale Deal ) आता एक संशयास्पद मुद्दा बणून राहिला आहे. फ्रेंच विमान कंपनी दसॉ (Dassault) कडून भारताने तब्बल 36 राफेल लढावू विमाने खरेदी केली आहेत. हा खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ असलेल्या दलालास तब्बल 7.5 मिलीयन यूरो म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 650 मिलीयन अथवा 65 कोटी रुपये देण्यात आले. तसेच, भारतीय तपास यंत्रणा कागदपत्रे उपलब्ध असूनही या प्रकरणाची चौकशी करण्यास अयशस्वी ठरली, अशी चर्चा आहे. एक फ्रेंच पोर्टल Mediapart ने याबाबत एक रिपोर्ट जाहीर केला आहे. मीडिया पार्टने दावा करताना उल्लेखलेल्या कागदपत्रांची लेटेस्ट मराठी या कोणत्याही पुष्टी करत नाही.
या ऑनलाईन पोर्टलने म्हटले आहे की, 59,000 कोटी रुपयांच्या राफेल व्यवहारात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. मीडियापार्टने कथीत खोट्या Invoices प्रकाशित केल्या आहेत. यात दिसते की, दसॉने कथित दलाल सुशेन गुप्ता याला गोपनीय पद्धतीने दलाली दिली. पोर्टलने म्हटले आहे की, या कागदपत्रांची उपलब्धता असूनही भारतातील केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली नाही. तसे त्याबाबत ठोस पावलेही उचलली नाहीत. (हेही वाचा, Rafale Deal: मोदी सरकार JPC चौकशीला का तयार नाही? राफेल विमान व्यवहारांवरुन राहुल गांधी यांचा सवाल)
मीडियापार्टच्या हवाल्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) जवळ ऑक्टोबर 2018 पासून पुरावे आहेत. दसॉने राफेल विमान खरेदी ऑर्डर मिळविण्यासाठी सुशेन गुप्ता याला लाच दिली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे पुरावे गोपनीय कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही संस्थांच्या वतीने आणखी एक भ्रष्टाचार प्रकरणात ऑकस्ता वेस्टलँड च्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सप्लाय घोटाळ्यात चौकशीत बरेच काही पुढे आले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी राफेल मुद्द्यावरुन अनेकदा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीए सरकारवर हल्ला चढवत आले आहेत. राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याच्या विधान आणि आरोपावर आपण आजही ठाम असल्याचे राहुल गांधी सांगतात.