पंजाबमधील (Punjab) अमृतसर (Amritsar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अमृतपाल नावाच्या व्यक्तीने आई, वहिनी आणि लहान पुतण्याची निर्घृण हत्या केली आहे. तिघांचीही हत्या केल्यानंतर तो गुरुद्वारात पोहोचला. येथून त्याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले, जिथे दोन महिला आणि एक मुलगा असे तीन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपालच्या आईला नुकतीच पेन्शन मिळाली होती. त्यामुळे तो आईकडे पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्याने त्याने आईची हत्या केली. त्यानंतर घरात उपस्थित असलेली त्याची वहिनी आणि पुतण्याची हत्या केली. अमृतपाल सतत नशा करत असल्याने त्याला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले होते. तो विमानतळावर नोकरी करत होता.
हत्या झालेल्या लहान मुलाच्या मावशीने सांगितले की, तिच्या बहिणीने (अमृतापालच्या वाहिनीने) आपल्या मुलाला केंब्रिज शाळेत प्रवेश मिळवून दिला होता तर मुली गावातील उत्तम स्थानिक शाळेत शिकत होत्या. त्यामुळे आपल्याही मुलींना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी तो सतत आईशी भांडत होता. अमृतपाल आईकडे वरचेवर पैसे मागायचा, आईही त्याला पैसे द्यायची. मात्र आपल्या पुतण्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाल्याचा राग त्याच्या मनात होता. तसेच त्याला ड्रग्जचेही व्यसन होता. अशात त्याने घरातील तीन सदस्यांची हत्या केली. अमृतपाल मानसिक तणावाखाली असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Murder Video: मद्यधुंद अवस्थेत मित्राची हत्या, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद, गाझियाबाद येथील घटना)
मात्र त्याच्या पत्नीने सांगितले की, तिचा पती कोणत्याही मानसिक तणावाखाली नव्हता, तर तो ड्रग्ज व्यसनी होता. तिने स्वतः तिच्या पतीला अनेक वेळा ड्रग्ज घेताना पकडले आणि त्यामुळेच ती आपल्या दोन मुलींसोबत बऱ्याच दिवसांपासून माहेरी राहत होती. पत्नीने पुढे असेही सांगितले की, तिच्या नवऱ्याच्या मनात आपल्या भावाविरुध्द द्वेष होता, कारण त्याला मुलगा होता आणि त्याचे आईवडील सर्व मालमत्ता भावाला देणार होते. या वैमनस्यातून त्याने 3 जणांची हत्या केली.