खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' (Waris Punjab De) संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या (Amritpal Singh) अटकेसाठी पोलिसांची पंजाब (Punjab) राज्यात धडक कारवाई सुरू केली आहे. त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंहच्या 78 साथीदारांना अटक केली होती. एनआयएने अमृतपालचा फायनॅन्सर दलजित सिंह कलसीसह चार साथीदारांना अटक केली आहे. या आरोपींना आसामच्या डिब्रुगड येथील तुरुंगात एका खास विमानाने नेण्यात आले. तसेच पोलिसांनी अमृतपाल सिंहला फरार घोषीत केले असून 21 मार्च पर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा तसेच एसएमएस सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. पंजाब मधील वाढते तणावाचा वातावरण पाहता हा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.
पंजाब सरकारने मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस (मेसेजिंग) सेवेवरील बंदी मंगळवार दुपारपर्यंत वाढवली आहे. यासोबतच खलिस्तान समर्थक कट्टरवादी प्रचारक अमृतपाल सिंगचा शोध सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. राज्य सरकारने शनिवारी इंटरनेट आणि एसएमएस सेवा रविवारी दुपारपर्यंत स्थगित केली. त्यानंतर सोमवारी दुपारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
गृहविभाग आणि न्याय विभागाने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार, "सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि मोबाइल नेटवर्कवर प्रदान केलेल्या व्हॉईस कॉल्स वगळता सर्व डोंगल सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबमध्ये 20 मार्च (दुपारी 12 पासून) ते 21 मार्च (दुपारी 12 नंतर) सार्वजनिक सुरक्षिततेच्या हितासाठी, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी, शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये म्हणून बंद करण्यात आले आहेत.
गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी जारी केलेल्या आदेशानुसार, बँकिंग सुविधा, रुग्णालय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत म्हणून ब्रॉडबँड सेवा रद्द केल्या नसल्याचे सांगितले.