Pune Metro (PC - Wikipedia)

Pune Metro: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यासह पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला मोठा चालना देण्यासाठी, महाराष्ट्र राज्य सरकारने पुणे मेट्रोच्या टप्पा 2 ला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी मंत्रिमंडळाचे हे मोठे निर्णय असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

मंजूर झालेल्या फेज 2 मधील मार्ग- खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी-नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग असा आहे. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे जाईल. या मार्गिंकांची एकूण लांबी 31.63 कि.मी. असून 28 उन्नत स्थानके आहेत. यासाठी 9 हजार 817 कोटी 19 लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पास महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

सध्या पुणे शहरातील काही मार्ग पूर्ण झाले आहेत, काहींचे बांधकाम सुरू आहे, तर काही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. आता मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य सरकारने दिलेली मंजुरी ही रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘या दोन मेट्रो मार्गांना आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असून, यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे अधिक मजबूत होईल.’ (हेही वाचा: PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर; Pune Metro, Solapur Airport सह 22,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे करणार राष्ट्रार्पण)

खडकवासल्याहून खराडीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गामध्ये दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट स्थानक असणार असून पुढे हडपसर मार्गे खराडीला जाणार आहे. तर दुसरी मेट्रो नळस्टॉपपासून पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलत नगर (सनसिटी) या मार्गे माणिकबागेला जाणार आहे. या दोन्ही मेट्रो मर्गिकेमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होणार आहे.