Pulwama encounter: भारतीय लष्कराची मोठी कारवाई; मोस्ट वॉंटेड दहशतवादी झाकीर मुसा ठार
इंडियन आर्मी (Photo Credits: IANS)

Pulwama encounter:  जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) राज्यातील पुलवामा (Pulwama) येथे भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अल कायदा या दहशतवादी संघटनेचा काश्मीर प्रदेशाचा अन्सार गजवत उल हिंद चा प्रमुख झाकीर मूसा याला ठार केले आहे. काश्मीर येथील त्राल येथे झालेल्या चकमकीत मुसा ठार झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनीही या वृत्ताची पुष्टी केली आहे. दहशतवादी मुसा याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. चकमक घडल्याच्या ठिकाणावरुन एके 47 आणि रॉकेट लॉन्चरही जप्त करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील त्राल येथील ददसारा परिसरात नाकाबंदी करुन तपास सुरु केला. (हेही वाचा, जम्मू काश्मिर: पुलवामा मध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक)

तपास मोहिमेदरहम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्या गोळीबाराला सैन्यानेही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. जम्मू-कश्मीर पोलिसांनी पुलवामा, अवंतिपोरा, श्रीनगर, अनंतनाग आणि बडगाम या ठिकाणांवरील सुरक्षा अधिक वाढवली आहे. तसेच, या ठिकाणची इंटरनेट सेवाही बंद केली आहे.