Bank Employee: बँक कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मिळणार आनंदाची बातमी, सरकार लवकरच घेणार 'हा' मोठा निर्णय
Representational Image (Photo Credit: PTI)

सर्व बँकांना शनिवारी सुट्टी (Saterday Holiday) जाहीर करण्याबाबत केंद्र सरकार (Central Govt) निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची व्यवस्थापन संस्था असलेल्या इंडियन बँक असोसिएशनने सर्व बँकांमध्ये शनिवार सुट्टी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session of Parliament) राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सरकारनेच ही माहिती दिली आहे. त्यामुळं सरकारी बँकांचे कामकाज आठवड्यातून पाच दिवस होण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.  (हेही वाचा - Byju’s Financial Crisis: कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी बायजूचे संस्थापक रवींद्रन यांनी घर ठेवले गहाण)

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पाच दिवस काम करण्याच्या मागणीबाबत बँक संघटना किंवा आयबीएने सरकारकडे कोणता प्रस्ताव सादर केला आहे का? सरकार त्याची अंमलबजावणी करणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सभागृहात दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, इंडियन बँक्स असोसिएशनने सर्व शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.

डिसेंबर 2023 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सरकार बँकांमध्ये 5 दिवस काम करण्याच्या निर्णयासह सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 20 टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता देऊ शकते. त्यानंतर महिन्यातील सर्व शनिवारी बँकांना सुट्टी असेल. वेतनवाढीबाबत 12 व्या द्विपक्षीय समझोत्याबाबत बँक संघटना आणि IBA यांच्यात सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे.