Petrol Bomb Hurled Near Shaheen Bagh Protest (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. संपूर्ण देशात याचे पालन होताना दिसत आहे. अशात दिल्लीच्या शाहीन बाग (Shaheen Bagh) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नागरिक सुधारणा कायद्याविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन करत असलेल्या लोकांनी, निषेधस्थळी पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप केला आहे. रविवारी निषेधस्थानाजवळ पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. या घटनेचे नेतृत्व नेमके कोणी केले याबद्दल माहिती मिळू शकली नाही. सध्या पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.

यावेळी बॅरिकेडजवळील प्लास्टिकच्या बाटलीत काही स्फोटक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत बोलताना विशेष पोलिस आयुक्त म्हणाले की, कोणतीही मोठी घटना घडली नाही. जनता कर्फ्यूच्या दिवशी रविवारी फक्त 4-5 महिला शाहीन बाग निषेध ठिकाणी बसल्या आहेत.’ जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनीही असा दावा केला आहे की, गेट क्रमांक 7 वर असलेल्या प्रोटेस्ट साइटवर काही लोकांनी पेट्रोल बॉम्ब टाकला. (हेही वाचा: जनता कर्फ्यू काळातही चालू राहणार शाहीन बागचे आंदोलन; प्रत्येक व्यक्तीस 4 तासच निषेध करण्याची परवानगी, पुरवले जाणार मास्क)

काचेचे तुकडे अजूनही प्रोटेस्ट साइटवर पडले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकून लोक साईटवर जमा झाले त्यावेळी तिथून फक्त धूर निघत होता. पल्सर दुचाकीवरून दोन जण आले होते, त्यांनीच हे कृत्य केल्याचा संशय आहे. मात्र जामिया निषेधस्थळी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता, आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा विषय ऐकण्यास सहमती दर्शविली असून, न्यायालय त्यावर 23 मार्च रोजी सुनावणी करणार आहे.