‘मी जाईन तर फक्त राजधानी एक्स्प्रेसनेच (Rajdhani Express) जाईन, जर मला बसनेच जायचे असते तर मग रेल्वेचे तिकीट का काढले असते?’ असा सवाल करणाऱ्या अनन्या या एकट्या प्रवाशाला रांचीला (Ranchi) सोडण्यासाठी रेल्वे (Indian Railways) तब्बल 535 किलोमीटर धावली. कदाचित रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असावी. डालटनगंज स्थानकात अडकलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या अनन्याच्या जिद्दीपुढे रेल्वे अधिकारीही झुकले व तिला राजधानी एक्सप्रेसनेच दुपारी डाल्टनगंजहून परत माघारी, गोमो आणि बोकारो मार्गे रांचीला सोडले. ही गाडी दुपारी 1.45 वाजता रांची रेल्वे स्थानकावर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रांचीला जाण्यासाठी दिल्ली येथून तिच्या वेळेत सुटली. मात्र लातेहार जिल्ह्यातील टोरी येथील टाना भगतांचे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन चालू होते. या कारणास्तव डाल्टनगंज येथेच ट्रेन थांबली. अधिकाऱ्यांना वाटले की आंदोलन संपेल, मग ट्रेन रांचीला पाठवली जाईल. परंतु आंदोलन संपले नाही. ही गोष्ट रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना कळविण्यात आली. त्यांनी सर्व प्रवाशांना बसमार्गे रांचीला पाठविण्याचे आदेश दिले व डाल्टनगंजमध्येच ट्रेन उभी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्व प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडून बस मार्गे आपल्या गंतव्य स्थानाकडे निघून गेले, मात्र अनन्या ट्रेनमधून उतरली नाही. अनन्या ट्रेनमध्ये एकमेव प्रवासी होती. 930 प्रवाशांपैकी 929 प्रवाश्यांनी डालटनगंज येथे रेल्वे सोडली. परंतु अनन्याला त्याच रेल्वेने रांचीला जायचे होते.
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना संपूर्ण गोष्ट सांगितली गेली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी डीआरएमला अनन्याला राजधानी एक्स्प्रेसने रांचीला पाठविण्याचे निर्देश दिले. त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थादेखील करावी असेही सांगितले. त्यानंतर रेल्वे रांचीला जाण्यासाठी निघाली. डाल्टनगंज ते रांची हे अंतर 308 किलोमीटर आहे. पण, ट्रेन गया येथून गोमो आणि बोकारो मार्गे रांचीला गेली. अशाप्रकारे ट्रेनला 535 किमी अंतर पार करावे लागले. अनन्याला संरक्षण देण्यासाठी अनेक आरपीएफ महिला सैनिक तैनात करण्यात आल्या होत्या. शेवटी ही गाडी दुपारी 1.45 वाजता रांची रेल्वे स्थानकावर आली. (हेही वाचा: राजधानी ते राजधानी अर्थातच मुंबई ते दिल्ली रेल्वे प्रवास अधिक वेगवान)
डालटनगंज रेल्वे स्थानक व्यवस्थापक अनिल कुमार तिवारी यांनी सांगितले की, अनन्या नवी दिल्ली-रांची स्पेशल राजधानी एक्सप्रेसमध्ये मुगलसराई येथून रांचीला जाण्यासाठी बसली. अनन्या ट्रेनच्या बी-3 कोचमध्ये होती व तिचा सीट नंबर 51 होता. अनन्या रांचीच्या एचईसी कॉलनी येथील रहिवासी असून, ती बीएचयू येथे एलएलबीचा अभ्यास करत आहे.