पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मोडला अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम; ठरले सर्वात प्रदीर्घ काळासाठी राहिलेले Non-Congress Prime Minister
Narendra Modi (Photo Credits: IANS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे गुरुवारी, 13 ऑगस्ट रोजी देशाचे असे चौथे पंतप्रधान बनले, ज्यांनी सर्वात जास्त पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम नोंदविला. यासह त्यांनी देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी असलेले बिगर-कॉंग्रेस नेते (Non-Congress Prime Minister) म्हणूनही विक्रम नोंदविला. यापूर्वी ही नोंद भाजपाच्या अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नावावर नोंदवली गेली होती. अटल जी त्यांच्या एकूण कार्यकाळात 2,268 दिवस पंतप्रधान राहिले. गुरुवारी पंतप्रधान मोदींनी हा विक्रम मोडला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आणखी मोठा विजय मिळविला व 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. ते आता भारतीय इतिहासातील चौथे प्रदीर्घ काळासाठी राहिलेले पंतप्रधान ठरले आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे 3 वेळा भारताचे पंतप्रधान राहिले होते. ते प्रथम 1996 मध्ये पंतप्रधान झाले पण बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यानंतर 1998 आणि 1999 मध्ये ते पंतप्रधान झाले आणि 2004 पर्यंत सत्तेत राहिले. वाजपेयी हे आपला कार्यकाल पूर्ण करणारे पहिले बिगर-कॉंग्रेस पंतप्रधान होते. (हेही वाचा: पीएम नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी; ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजप कार्यालयात प्रकाशन)

प्रदीर्घ काळासाठी पंतप्रधान असण्याचा रेकॉर्ड पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. ते 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान होते. दुसर्‍या स्थानावर त्यांची मुलगी इंदिरा गांधी आहेत, ज्या 15 वर्षे 350 दिवस देशाच्या पंतप्रधान होत्या. मनमोहन सिंग हे नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या तिसरे प्रदीर्घ पंतप्रधान राहिले. त्यांनी 10 वर्षे 4 दिवस देशाचे पंतप्रधानपद भूषवले. 22 मे 2004 ते 26 मे 2014 पर्यंत ते पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातचे सर्वात प्रदीर्घ मुख्यमंत्री असल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.