पीएम नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी; ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजप कार्यालयात प्रकाशन
‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे प्रकाशन (Photo Credit : Twitter)

नुकतेच भाजपाच्या (BJP) दिल्लीतील कार्यालयात एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकावरू वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना शिवाजी महाराजांशी (Chatrapati Shivaji Maharaj) केली गेली आहे.

‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. हे पुस्तक जय भगवान गोयल यांनी लिहिले आहे, जे भाजपचे नेते आहेत. महत्वाचे म्हणजे भाजपच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याने त्यावर चर्चा सुरु आहे. याबाबत  सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे.

जय भगवान गोयल यांनी आपल्या सोशल मिडियावरून या पुस्तक प्रकाशनाची माहिती दिली. दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिण्यात आलेले ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली गेली आहे. गोयल यांनी ट्वीट करताना या पुस्तक प्रकाशनाचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.

या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपाच्या नेत्यांची उपस्थिती होती. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जगाच्या अंतापर्येंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही, 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पटत नाही मनाला, असे त्यांनी सांगितले आहे. या पुस्तकाबाबत सोशल मिडीयावर प्रचंड विरोध होत असून, हे पुस्तक मागे घेण्याची मागणी केली जात आहे.