कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे देश आणि जगभरातील परिस्थिती बदलली. या आधी आपण प्रत्येक कार्यक्रमात एकत्र येत होतो. मात्र, कोरोना व्हायरस संकटाने ते शक्य नाही. कोरोना व्हायरसमुळे सर्वांचीच काम करण्याची पद्धत बदलली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Mod) यांनी देशभरातील ग्रामपंचायत सरपंचांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे संवाद साधला. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी ग्रामपंचायतींसाठी e-GramSwaraj App, स्वामित्व योजना (Swamitva Yojana) जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनाचे औचित्य साधत सरपंचांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी विविध योजना जाहीर केल्या. गावांनी स्वयंपूर्ण होत आत्मनिर्भर व्हावे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
गावांनी आत्मनिर्भर व्हावे
कोरना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी आत्मनिर्भर व्हायलाच हवे. कोरोना व्हायरस संकटाने कधी कल्पनाही केली नसेल इतक्या समस्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी गाव, तालुका आणि जिल्हा अशा सर्व पातळ्यांवर आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे. आत्मनिर्भर होणे म्हणजे स्वयंपूर्ण होणे. आपल्या गरजांसाठी इतरांकडे जावे लागू नये, हे आपल्याला कोरोना संकटाने शिकवले असेही मोदी या वेळी म्हणाले.
इंटरनेटने केली क्रांती
देशभरामध्ये इंटरनेटने क्रांती केली आहे. सहा वर्षांपूर्वी 100 पेक्षाही कमी ग्रामपंचायतींध्ये इंटरनेट होते. आज घडीला देशभरात सुमारे 1.25 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवेने जोडण्यात आले आहे. आज व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे सवाद साधला जात आहे. आज प्रत्येक गावात स्मार्टफोन आहेत. ही इंटरनेटची कमाल आहे.
नव्या योजनांची घोषणा
गाव आणि शहर या दोन्हींना जोडण्यासाठी दोन नव्या योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. ज्या द्वारे गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. ग्रामपंचायत कारभार कसा चालतो. कोण कसे काम करत आहे. गावचा विकास कोणत्या स्थितीत आहे. या सर्वांची पारदर्शी माहिती एका अॅपद्वारे नागरिकांना मिळणार आहे.
स्वामित्व योजना
स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक संपत्तीचे ड्रोनच्या माध्यमातून मॅपींग केले जाईल. गावातील ग्रामपंचायत आणि गावाती नागरिकांना या संपत्तीच्या स्वामित्व हक्काचे एक प्रमाणपत्र दिले जाईल. ज्यामुळे गावात संपत्ती आणि जमीनजुमला यांवरुन निर्माण होणारे तंटे कमी होतील. गावचा विकास, गावाला विकासकामासाठी मिळणारा निधी, बँक कर्ज तसेच इतर कामांमध्ये सूत्रबद्धता येत जाईल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. भारतातील विविध 6 राज्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही मोदी म्हणाले.