डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत कार्यक्रमाचे नाव आता 'केम छो' नाही, 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' होणार; सरकारची घोषणा
Donald Trump | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) 24  फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प आपल्या दौऱ्यादरम्यान गुजरातमधील अहमदाबाद (Ahemdabad)  शहराला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद मध्ये भव्य दिव्य अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाचे नाव 'केम छो ट्रम्प' (Kem Chho Trump)  असे ठेवण्यात आले होते, पण जरी ट्रम्प गुजरात मध्ये येत असले तरी हा त्यांचा भारत दौरा असणार आहे त्यामुळे नाव गुजराती मधून ठेवण्यात काहीही अर्थ नाही असे म्हणत अनेकांनी या नावाला विरोध दर्शवला होता. याच मुद्द्यावरून आता हे नाव बदलून 'नमस्ते ट्रम्प' (Namaste Trump)  असे करण्यात येणार असल्याचे समजतेय. दरम्यान पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' या थीमला मंजुरी मिळणे बाकी आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर सर्व बोर्ड्स आणि होर्डिंग्जवर ही थीम दिसू लागेल.

‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ या अहमदाबाद मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमावर मनसेचा आक्षेप

प्राप्त माहितीनुसार, ट्रम्प यांचा स्वागत कार्यक्रम फक्त गुजरात पुरताच मर्यादित राहू नये आणि ती देशव्यापी असावा यासाठी त्यात बदल करून त्याचे नाव 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' असे करण्यात आले आहे.या माध्यमातून गुजरात येथील या दौऱ्याला राष्ट्रीय व्यापकता प्राप्त व्हावी असा प्रयत्न आहे.याबाबत गुजरातचे मुख्य सचिव अनिल मुकीन यांनी माहिती दिली आहे. नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प या संकल्पनेच्या आधारावरच देशभरात प्रचार करावा आणि त्याबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करावे असे केंद्र सरकारने गुजरात सरकारला सांगितले असल्याचेही मुकीन यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद विमानतळ ते मोटेरा स्टेडियम दरम्यान स्वागताला 5-7 लाख लोकं असतील: डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यासाठी उत्सुक.  

24 ते 25 फेब्रुवारी दरम्यानच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौ‍‍‍‍‍र्‍यात सर्वात आधी ते दिल्लीला भेट देतील. त्यानंतर ते विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी अहमदाबादला जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही त्यांच्याबरोबर मोटेरा स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.