Lockdown मुळे बंगळुरु येथील गरोदर महिलेचा हॉस्पिटलच्या शोधात 7 किमी पायी प्रवास; दातांच्या दवाखान्यात दिला बाळाला जन्म
Pregnant Woman Gives Birth At Dentist Clinic (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही लांबला आहे. याचा परिणाम आर्थिक, सामाजिक आणि अगदी वैयक्तिक स्तरावरही होत आहे. याची प्रचिती देणारी एक घटना कर्नाटक मधील बंगळुरू येथून समोर येत आहे. बंगळुरु (Bengaluru) मधील Doddabommasandra भागातील एका गरोदर महिलेने आपल्या पतीसह हॉस्पिटलच्या शोधात तब्बल 7 किलोमीटर पायी प्रवास केला.  प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर ही महिला आपल्या पतीसह हॉस्पिटलच्या शोधात बाहेर पडली. मात्र बरेच चालल्यानंतर अखेर एका दातांच्या दवाखान्यात तिने बाळाला जन्म दिला.

प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर हॉस्पिटलच्या शोधात ती 5-7 किलो चालली. अखेर एक दवाखाना तिच्या दृष्टीस पडला आणि तिथे पोहचल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत तिने बाळाला जन्म दिला, अशी माहिती  डिलिव्हरी करणाऱ्या डेंटल सर्जन डॉ. रम्या यांनी दिली आहे. त्याचबरोबर सुरुवातीला बाळ काही प्रतिसाद देत नव्हतं. पण नंतर हळूहळू बाळ नॉर्मल झालं, असेही त्यांनी सांगितले. (Lockdown: एक वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन जोडप्याचा नागपूर ते मध्य प्रदेश सायकल प्रवास)

ANI Tweet:

लॉकडाऊनमुळे प्रसुतीसाठी या जोडप्याला कोठेही हॉस्पिटल मिळाले नाही. प्रसुतीनंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी बाळ आणि आईला केसी केंद्र सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. यापूर्वी लॉकडाऊनमुळे हाल झालेल्या लोकांच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांअंतर्गत रिक्षा थांबवल्यामुळे केरळमधील एका व्यक्तीने आपल्या आजारी वडीलांना उचलून चालत नेले होते. तर कोणी लहान मुलांसह दूरवरचा प्रवास पायी केला आहे.