PMO on Sale: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदीय कार्यालय OLX वर विक्रीला; साडेसात कोटी किंमत,चौघांना अटक
PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसीमधील नवीन संसदीय कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी काही खोडसाळ व्यक्तींनी पंतप्रधान मोदींचे वाराणसीच्या गुरुधाम कॉलनीतील कार्यालय (PMO) ऑनलाइन खरेदी विक्री साइट ओएलएक्सवर (OLX) विक्रीसाठी ठेवले. ओएलएक्सवर या कार्यालयाच्या विक्रीची जाहिरात पाहिल्यानंतर पंतप्रधानांच्या कार्यालयाची विक्री नक्की का होत आहे यावरील चर्चा सुरु झाली. या लोकांनी कार्यालयाच्या विक्रीसाठी सुमारे साडेसात कोटींची किंमत ठेवली होती. या घटनेनंतर प्रकरणाची चौकशी सुरु झाली व आता पोलिसांनी 4 व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक साइट ओएलएक्सवर पीएम मोदी यांच्या संसदीय कार्यालयाच्या विक्रीची जाहिरात लक्ष्मीकांत ओझा नावाच्या वापरकर्त्याच्या आयडीवरून शेअर केली गेली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वाराणसीचे एसएसपी अमित कुमार पाठक यांनी या प्रकरणात सांगितले की, ओएलएक्सवरील जाहिरात त्वरित काढून टाकण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे व चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्याने संसदीय कार्यालयाचा फोटो घेऊन तो ओएलएक्सवर पोस्ट केला त्या व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' OLX वर विक्रीला ठेवण्याची चेष्टा; 30,000 कोटी किंमत)

ओएलएक्सवर दिलेल्या जाहिरातीचा क्रमांक- ID 1612346492 असा होता. त्यामध्ये लिहिले होते, घराचा प्रकार- घरे आणि व्हिला, बाथरूमसह चार बेडरूम, पूर्ण फर्निचरसह सुसज्ज घर, इमारत क्षेत्र 6500 चौरस फूट, दोन मजली इमारतीमध्ये दोन कार पार्किंग विक्रीला. यासह या प्रकल्पाचे नाव 'पीएमओ कार्यालय वाराणसी' असे देण्यात आले होते. या जाहिरातीमध्ये कार्यालयाची किंमत साडेसात कोटी नमूद केली होती. विक्रेता लक्ष्मीकांत ओझा याने दिलेल्या मोबाईल नंबरवर अनेक कॉल आले मात्र त्याने हे कॉल घेतले नाहीत. आता नक्की कोणत्या उद्देशाने ही जाहिरात देण्यात आली होती याची चौकशी सुरु आहे.