भारतात नटवरलाल माहित नसेल अशी क्वचित एखादी व्यक्ती सापडेल. नटवरलाल इतका सराईत चोर होता की त्याने त्याकाळी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाक्षरीची कॉपी करून, ताज महल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि 545 खासदारांना विकले होते. आताही या घटनेशी मिळतीजुळती एक गोष्ट घडली आहे व यावेळी लक्ष्य करण्यात आले आहे ते पीएम नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue Of Unity) ला. होय, एका महाभागाने ओएलएक्स (OLX) वर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या विक्रीची जाहिरात दिली आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटी - सरदार वल्लभभाई पटेल, आयर्न मॅन ऑफ इंडिया यांचा जगातील सर्वात उंच पुतळा. तब्बल 2989 कोटी खर्च करून उभारण्यात आलेला हा पुतळा 2018 साली पूर्ण झाला. हा पुतळा उभारण्यासाठी जितका खर्च करण्यात आला त्याबाबत मोदी सरकारला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र आता देशावर कोरोना व्हायरसचे संकट आले आहे, अशावेळी सरकारला मदतीचे गरज आहे. हीच संधी साधून या व्यक्तीने स्टॅच्यू ऑफ युनिटी ओएलएक्सवर 30,000 कोटींसाठी विक्रीसाठी ठेवले आहे. (हेही वाचा: या चार चोऱ्यांनी एकेकाळी हादरला होता संपूर्ण देश; विकला होता ताज महल, लाल किल्ला आणि संसद भवन)
याच्या जाहिरातीमध्ये लिहिले होते, 'सध्या देशात हॉस्पिटल्स आणि हेल्थकेअर इक्विपमेंट्ससाठी पैशांची आवश्यकता असल्याने 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' विकण्याची वेळ आली आहे.' मात्र अर्थातच हा फार मोठा विनोद असल्याने आणि चेष्ट्ने ही गोष्ट केल्याने कंपनीने ताबडतोब ही जाहिरात आपल्या पोर्टलवरून हटवली आहे. मात्र सोशल मिडीयावर या गोष्टीची तुफान चर्चा चालू आहे. दरम्यान, केवाडिया येथील सरदार सरोवराच्या काठावर सुमारे 182 मीटर उंचीचा हा पुतळा उभा राहिल्यापासून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. 3 नोव्हेंबर 2018 रोजी तब्बल 27 हजार लोकांनी या पुतळ्याचे दर्शन घेतले होते.