PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज ओडिशा येथील बालासोर (Balasore) दौऱ्यावर रवाना होतील. बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघात ( Bengaluru-Howrah Express Train Accident) स्थळाला भेट देऊन ते पाहणी करतील. तसेच, मदत आणि बचाव कार्याचाही आढावा घेतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कटक येथील रुग्णालयाला भेट देणार असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. ओडिशा राज्यात बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेनला ( Bengaluru-Howrah Express) भीषण अपघात घडला. एकाच वेळी तीन ट्रेन एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. रेल्वेने अधिकृतपणे केलेल्या निवेदनात आतापर्यंत 238 नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाला असून 900 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

मदत आणि बचाव कार्याविषयी माहिती देताना राष्ट्रीय आपत्ती निवारण (NDRF) चे या मोहिमेचे IG नरेंद्र सिंग बुंदेला यांनी म्हटले आहे की, अजूनही सुरू आहे. आतापर्यंत राज्य सरकारने 238 मृत आणि 900 हून अधिक जखमींची घोषणा केली आहे. साधारण आज सायंकाळपर्यंत आम्ही मदत आणि बचाव कार्याची मोहीम पूर्ण करु अशी आम्हाला आशा आहे. NDRF कडे नऊ टीम आहेत. त्यापैकी सात ओडिशातील आणि दोन पश्चिम बंगालमधील आहेत. जवळपास सर्व जिवंत पीडितांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे त्यामुळे नऊ टीम पुरेशा आहेत, असेही नरेंद्र सिंह बुंदेला यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Odisha Train Accident: ओडिशा येथील रेल्वे अपघातात 237 ठार, 900 हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची भीती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बालासोरला रवाना)

ट्विट

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवीन पटनायक यांनी म्हटले की. अत्यंत दुःखद रेल्वे अपघात.. मला स्थानिक संघटना, स्थानिक लोक आणि इतरांचे आभार मानावे लागतील. ज्यांनी लोकांना ढिगाऱ्यातून वाचवण्यासाठी रात्रभर काम केले. रेल्वेच्या सुरक्षेला नेहमीच प्रथम स्थान दिले पाहिजे. अपघातग्रस्तांना बालासोर आणि कटक येथील इस्पितळात प्राधान्याने न्यावे लागेल जेणेकरून ते लवकरात लवकर बरे होतील.

ट्विट

दुसऱ्या बाजूला केंद्रीय रेल्वेमंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) शनिवारी (3 जून) दाखल झाले आहेत. वैष्णव यांनी अपघातग्रस्त रेल्वेची संपूर्ण पाहणी केली. मदत आणि बचाव कार्य राबविणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती निवारण (NDRF) दलांच्या पथकांसोबत चर्चा करुन त्यांनी प्रशासकीय यंत्रणेकडून आढवाही घेतला. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी अपघाताबद्दल विचारले असता त्यांनी 'मदत आणि बचाव कार्यास प्रथम प्राधान्य.. राजकारणासाठी वेळ नाही', अशी प्रतिक्रिया दिली.