पीएम नरेंद्र मोदी उद्या दुपारी 1:30 वाजता 'India Global Week' ला संबोधित करणार; 5000 हून अधिक लोक, तर दोनशेहून अधिक वक्ते सहभागी होणार
पीएम नरेंद्र मोदी (Photo Credit-ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारपासून ब्रिटनमध्ये आयोजित ‘इंडिया ग्लोबल वीक 2020’ (India Global Week 2020) या जागतिक स्तरावरील व्यासपीठाला संबोधित करणार आहेत, जे भारताच्या व्यवसाय आणि परकीय गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करणार आहे. इंडिया इंक (India Inc) ग्रुपने याचे आयोजन केले आहे. यामध्ये कोरोना व्हायरस नंतरच्या जागतिक आर्थिक पुनरुज्जीवन विषयक बाबींवर चर्चा होईल. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा तीन दिवसांचा कार्यक्रम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे व्हर्चुअल उद्घाटन करतील. कोरोना कालावधीत ही पहिलीच वेळ असेल जेव्हा पंतप्रधान मोदी केवळ आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन करणार नाहीत, तर त्यास संबोधितही करतील.

एएनआय ट्वीट -

9 ते 11 जुलै या कालावधीमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, रेल्वेमंत्री पियुष गोयल, विमान वाहतूक व नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि कौशल्य विकास मंत्री महेंद्र नाथ पांडे हे भारतातील प्रमुख वक्ते असतील. प्रिन्स चार्ल्स ब्रिटनच्या वतीने या कार्यक्रमात खास भाषण करणार आहेत. याशिवाय परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब, गृहमंत्री प्रीती पटेल, आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री लिझ ट्रस देखील संबोधित करतील. (हेही वाचा: India-China Border Dispute: राहुल गांधी यांच्या तीन प्रश्नांचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकार देणार का?)

‘इंडिया ग्लोबल वीक’ दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद आयोजित करते. कोरोनामुळे पहिल्यांदाच यावेळी ही परिषद व्हर्चुअली आयोजित केली जात आहे. असे मानले जाते की जागतिकीकरणावरील ही आतापर्यंतची भारतातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद आहे, ज्यामध्ये जगभरातील 5000 हून अधिक लोक उपस्थित असतील, तर दोनशेहून अधिक वक्ते संबोधित करतील. तीन दिवसीय या परिषदेत व्यवसाय, रणनीती आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चा होईल. या व्यतिरिक्त, व्यवसाय, कला आणि संस्कृती, बँकिंग आणि वित्त, फार्मा, संरक्षण आणि सुरक्षा, सामाजिक प्रभाव आणि इतर सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर जागतिक स्तरावर चर्चा केली जाईल.