Rahul Gandhi |  (Photo Credit: YouTube)

India-China Border Tensions: वायनाड येथील खासदार आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लद्दाख प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. लद्दाख प्रदेशातून चीन आपले सैन्य मागे घेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि चीनचे स्टेट काउंसिलर वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे घडल्याचेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी एक ट्विट करत मंगळवारी तीन प्रश्न विचारले आहेत. गलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाही असा मुद्दा उपस्थीत करत विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा केंद्र सरकार देणार का? याबाबत उत्सुकता आहे.राष्ट्रहीत सर्वोच्च असून त्याचे रक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी विचारलेले तीन प्रश्न

    •  तणाव निर्माण होण्याआधीची परिस्थिती ‘जैसे थे’ कायम ठेवण्यावर भर का नाही देण्यात आला?
    •  आपल्याच हद्दीत घुसखोरी करुन आपल्या 20 निशस्त्र जवानांची हत्या करणाऱ्या चीनला ते योग्य आहे हे ठरवण्याची संधीच का दिलीत?
    •  गलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाही करण्यात आला?

(हेही वाचा, PM Narendra Modi Leh Visit: विस्तारवादामुळे जगाचं मोठं नुकसान, आता विकासयुग सुरू झालंयं; PM नरेंद्र मोदी यांनी वाढवलं भारतीय जवानांचं मनोधैर्य)

दरम्यान, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि चीनचे स्टेट काउंसिलर वांग यी यांच्यात दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण संबंध राहण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले. प्रसारमाध्यमांनी सोमवारी वृत्त दिले होते की, लद्दाख प्रदेशातून एक्चुअल लाइन ऑफ कंट्रोल (LAC) पासून दोन्ही देशांचे सैन्य (चीन, भारत) मागे हटत आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे तीन प्रश्न विचारले आहेत.