File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

चीनच्या (China) वूहानमधून कोरोना व्हायरस (Coronavirus) या विषाणूला सुरुवात झाली. बघता बघता या व्हायरसने संपूर्ण जग व्यापून टाकले. आता जगाच्या पाठीवर असा क्वचितच देश असेल जिथे या विषाणूने शिरकाव केला नाही. भारतातही या विषाणूबाधीत लोकांची संख्या वाढत आहे. शहरातील गर्दीमुळे हा धोका अजूनच वाढला आहे, म्हणूनच लोक शहरे सोडून आपापल्या गावी प्रवास करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अशा काळात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत ट्वीट करत त्यांनी माहिती दिली आहे.

पीएम मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘कोरोनाच्या भीतीपोटी, माझी बरीच भावंडे, ज्या ठिकाणी काम करत आहेत ती शहरे सोडून आपल्या गावी परतत आहेत. मात्र गर्दीत प्रवास केल्याने या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. आपण जिथे जात आहात तिथल्या लोकांसाठी आधीच धोका आहे, मात्र आपण प्रवास करून आपले गावकरी आणि कुटुंबाच्या अडचणी देखील वाढवत आहात.’

पुढे ते म्हणतात, ‘मी सर्वांना विनंती करतो की, आपण ज्या शहरात आहात त्या शहरातच काही दिवस रहा. याद्वारे आपण सर्वजणच हा रोग पसरण्यापासून रोखू शकतो. रेल्वे स्टेशन, बस स्थानके या ठिकाणी गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशी खेळत आहोत. कृपया स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची चिंता करा व आवश्यकता नसल्यास घर सोडू नका.’ (हेही वाचा: 'कोरोना का पंचनामा' अशी कॅप्शन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला कार्तिक आर्यनचा जनजागृती संदेश; पहा व्हिडिओ)

दरम्यान, सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर अशा सर्वात मोठ्या शहरांत सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत. हीच परिस्थिती देशातल्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरांमध्ये कामानिमित्त आलेले लोक आपापल्या गावी परतत आहेत. मात्र यामुळे रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे या विषाणूचे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. म्हणूनच पीएम मोदी यांनी लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.