पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या म्हणजेच शुक्रवारी केदारनाथच्या (kedarnath) दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक केदारनाथ धाममध्ये त्यांच्यासोबत असतील. भारतीय जनता पक्षाने 5 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक पुनर्जागरणासाठी देशभरात भव्य कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात पूजा करतील आणि आदि शंकराचार्यांच्या समाधीचे अनावरण करतील. सकाळी 7.45 ते साधारण 11 वाजेपर्यंत पंतप्रधान केदारनाथ येथे असतील.
मोदींच्या केदारनाथच्या ऐतिहासिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशभरात भव्य सांस्कृतिक पुनर्जागरण कार्यक्रमांची आखणी केली आहे. या कार्यक्रमांमध्ये चार धाम, 12 ज्योतिर्लिंग आणि 87 प्रमुख मंदिरांमध्ये आयोजित कार्यक्रमांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी पूज्य संत, अध्यात्मिक नेते, केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यातील धार्मिक स्थळांवरून व्हिडिओ लिंकद्वारे या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवतील.
यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काशीमधून, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उज्जैन महाकालमधून, झारखंडमधील बैद्यनाथ धाम येथून अन्नपूर्णा देवी, सोमनाथ येथून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि दर्शन जरदोश, द्वारका पीठातून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, कामाख्यातून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे कुरुक्षेत्र येथून, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर ज्वालामुखी येथून, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान गोवर्धन मठातून, रामेश्वरम येथून येथील केंद्रीय मंत्री एल. मुरुगन. तसेच, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या ठिकाणी भाजपचे अनेक दिग्गज नेते, आमदार, खासदार, मंत्री आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असतील. के सुरेंद्रन आणि अनेक नेते केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्यासह केरळमधील आदि शंकराचार्यांची जन्मभूमी असलेल्या कालडी गावात उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांशिवाय अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देशातील अशा 87 वेगवेगळ्या ठिकाणांवरून जोडले जातील, जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आदि शंकराचार्यांशी संबंधित आहे.
दरम्यान, 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या भीषण पुरात शंकराचार्यांच्या समाधीचे नुकसान झाले होते. ही समाधी पुन्हा बांधण्यात आली आहे. संपूर्ण पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पंतप्रधानांचा हा कार्यक्रम यासाठीही महत्त्वाचा आहे कारण पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावेळी पंतप्रधान 400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कार्यक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. यासोबतच ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. हिवाळ्यासाठी केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद होण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींचा हा दौरा असेल.