Retired Justice Of SC Markandey Katju | (Photo Credits: Facebook)

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्याविरुद्ध न्यायालयात जनहीत याचिका (PIL) दाखल झाली आहे. न्यायमूर्ती काटजू (Markandey Katju) यांनी इंग्लंडच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेसी कोर्टात हीरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याच्या प्रत्यार्पणाबाबत सुरु असलेल्या खटल्यात साक्ष दिली होती. त्यावरुनच ही याचिका दाखल झाली आहे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, न्यायमूर्ती काटजू यांच्या वर्तनामुळे भारतीय न्यायपालिकेची अखंडता आणि विश्वसनीयता यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नंद किशोर गर्ग या याचिकाकर्त्याने अधिवक्ता शशांक देव सुधी यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, भारतीय न्यायव्यवस्थेने ही बाब बेजबाबदारपणे घेऊ नये. कारण हा एक न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. आंतरराष्ट्रीय जनसमूदयासमोर भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकता आहे. खोटे आरोप आणि वर्तन याला पायबंद घालण्याची हीच वेळ आहे, असेही याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, काटजू यांनी केलेली वक्तव्य, जबाब हे अत्यंत अपमानजनक आहेत. ज्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा खराब होत आहे. याचिकाकर्त्याने पुढे म्हटले आहे की, काटजू यांनी आरोप केला होता की, भारतातील न्यायव्यवस्था 50 टक्के भ्रष्ट आहे. ज्यामुळे पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याला निष्पक्ष सुनावणीची संधी मिळणार नाही. (हेही वाचा, Retired SC Justice Markandey Katju On UK Court: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू इंग्लंडच्या कोर्टात मांडणार नीरव मोदी याची बाजू)

निरव मोदी प्रत्यार्पण प्रकरणात भारत सरकारच्या याचिकेच्या विरुद्ध आणि नीरव मोदी याच्या बाजूने चक्क भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काउन्सील ऑफ इंडिया चे माजी चेअरमन मार्केंडेय काटजू (Markandey Katju) उतरणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांतून झळकले होते. काटजू यांनी स्वत:ही या वृत्ताला पुष्टी केल्याचा दावा इकॉनॉमिक टाईम्सने आपल्या वृत्तात केला होता. त्या वृत्तानुसार न्यायमूर्ती काटजू यांनी म्हटले होते की, उद्या मी इंग्लंडच्या कोर्टात नीरव मोदी यांच्यासाठी एक साक्षीदार म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सादर होणार आहे. परंतू, मी खटल्याच्या मेरीटवर कोणतीही टिप्पणी करणार नाही. मी फक्त इतकेच म्हणेन की, त्यांना (नीरव मोदी) भारतात न्याय मिळू शकत नाही.