Golden Temple | Twitter

पंजाबच्या (Punjab) सुवर्ण मंदिर (Golden Temple) परिसरात गुरूवारच्या मध्यरात्री 12.30 च्या सुमारास तिसर्‍यांदा सौम्य स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला आहे. हा या आठवडाभरातील तिसरा स्फोट आहे. हे स्फोट सौम्य स्वरूपाचे असले तरीही पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू झाले आहे. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. तर मुख्य संशयिताचे छायाचित्र देखील आता प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान स्फोट घडवून समजातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडवणं हा यामागील उद्देश आहे. 6 मे आणि 8 मे दिवशी ब्लास्ट केल्यानंतर गुरूवारी रात्री देखील 12.15-12.30 च्या सुमारास स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ माजली होती. हा स्फोट Sri Guru Ram Dass Niwas जवळ झाला आहे. या स्फोटांमध्ये प्रामुख्याने फटाक्यांचा समावेश करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की संशयिताने गुरु राम दास सरायच्या दुसऱ्या मजल्यावरून ‘गलियारा’ किंवा सुवर्ण मंदिराच्या आजूबाजूच्या मार्गावर बॉम्ब फेकला होता.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) आणि पंजाब पोलिसांनी स्फोटाच्या ठिकाणाहून फॉरेन्सिक नमुने गोळा केले आणि घटनेचा तपास सुरू केला. प्राथमिक अहवालानुसार स्फोटात कोणतीही ट्रिगरिंग यंत्रणा वापरली गेली नव्हती.