PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला पद्म पुरस्कारासाठी (Padma Awards) नामांकने देण्याचे आवाहन केले. एका ट्वीटद्वारे भारतामध्ये तळागाळात विलक्षण कामगिरी करणाऱ्या लोकांची नावे देण्यास पंतप्रधानांनी सांगितले आहे. या पुरस्काराला त्यांनी ‘पीपल्स पद्म’ (People's Padma) असे नाव दिले आहे. पद्म पुरस्कारांच्या नामांकनाची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. नामांकनासाठी लोक आपली उमेदवारी अर्ज पोस्ट करू शकतील यासाठी एक दुवाही शेअर केला आहे. पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशन किंवा शिफारसी केवळ ऑनलाइन घेतल्या जातील, असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे.

या पुरस्कारांसाठी सरकारने स्वतःचे नामनिर्देशित करण्याचीही तरतूद केली आहे. पीएम मोदी यांनी ट्विट केले आहे की, ‘भारताकडे तळागाळात विलक्षण कामगिरी करणारे अनेक प्रतिभावंत लोक आहेत. बर्‍याचदा, आपणाला त्यांच्याबाबत जास्त माहिती नसते. तुम्हाला असे प्रेरणादायक लोक माहित आहेत? जर याचे उत्तर ‘होय’ असे असेल तर तुम्ही त्यांना #PeoplesPadma साठी नॉमिनेट करू शकता. नॉमिनेट करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर अशी आहे.’

पद्म पुरस्कार- पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत. पद्म पुरस्कारांच्या शिफारसी राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन, केंद्रीय मंत्रालये/विभाग, उत्कृष्ट संस्था इत्यादींकडून प्राप्त केल्या जातात. त्यांचा पुढे पुरस्कार समिती विचार करते. पुरस्कार समितीच्या शिफारसीच्या आधारे आणि पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. (हेही वाचा: Modi Cabinet Expansion: नव्या मंत्रीमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर फौजदारी खटले दाखल; 90 टक्के मंत्री आहेत कोट्याधीश- ADR Report)

गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक क्षेत्रातील कामगिरी आणि योगदानाबद्दल शेकडो लोकांचा पद्म पुरस्काराने गौरव केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि इतर पुरस्कार देणाऱ्यांना नामांकने देण्याचे आवाहन केले आहे, जे लोक त्यांच्या असाधारण कामगिरीच्या गौरवासाठी मान्यतेसाठी पात्र आहेत. 1954 मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली होती.