वादळी वाऱ्यामुळे 31 लोकांचा मृत्यू (फोटो सौजन्य-ANI)

वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाने मध्य प्रदेश (Madhya Pradesh), गुजरात (Gujrat) आणि राजस्थान (Rajasthan) या राज्यांना झोडपले आहे. तर मध्य प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस, वादळीवारा आणि वीजपडून 16 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजस्थान येथे विविध भागात पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे 6 जण आणि गुजरात येथे 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

वादळी वाऱ्यामध्ये मृत्यू झालेल्या प्रकारावरुन आता राजकरण सुरु झाले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या विविध भागात पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे मृत पावलेल्या लोकांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून 2 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. तर जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.(हेही वाचा-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; यावर्षी समाधानकारक पाऊस, भारतीय हवामान खात्याचा अंदाज)

यावरुन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदी यांना टोला लगावत असे म्हटले आहे की, वादळी वाऱ्याच्या संकटात फक्त गुजरात मधीलच नाही तर अन्य ठिकाणी सुद्धा लोक मृत पावले आहेत. परंतु गुजरातबद्दल तुमच्या भावना अधिकच जास्त दिसून येत आहेत.

तसेच साबरकाठा येथे मोदी यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेला मंडपसुद्धा वादळीवाऱ्यामुळे कोसळला आहे. तर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी असे सांगितले की मंडपाचा काही भाग फाटला तर काही भाग वाऱ्यामुळे उडून गेला.